मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून विमानतळ तसेच शाळा महाविद्यालयांसह विविध ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात देत आहे. अशातच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियालाही अशाच प्रकारच्या धमकीचा फोन प्राप्त झाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर हा धमकीचा फोन करण्यात आला.
त्यामुळे आता खळबळ उडाली आहे. काल सकाळी १० च्या सुमारास कस्टमर केअरला हा फोन करण्यात आला. यावेळी समोरच्या व्यक्तीने लष्कर-ए-तोयबाचा सीईओ असल्याचे सांगितले. तसेच मागचा रस्ता बंद करा, इलेक्ट्रिक कार खराब झाली आहे, असे म्हणत त्याने फोन ठेवला. त्यानंतर संबंधित अधिका-यांनी बँकेच्या सुरक्षा रक्षकाला जाऊन तपासणी करण्यात सांगितले.
मात्र, त्याठिकाणी अशी कोणतीही गाडी आढळून आलेली नाही.दरम्यान, या घटनेची गांभीर्याने दखल घेत रिझर्व्ह बँकेच्या अधिका-यांकडून माता रमाबाई मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. कुणी तरी खोडसाळ वृत्तीने हे कृत्य केल्याचा प्राथमिक संशय आहे.