बारामती : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना बारामती येथील टेक्स्टाईल पार्कमध्ये जाऊ न देता गेटवर थांबवण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या नात रेवती सुळे होत्या. दोघी टेक्स्टाईल पार्क येथे खरेदीसाठी गेले होते. पण जवळपास अर्धा तास दोघांना गेटवरच थांबवण्यात आले. यावेळी त्यांनी सुरक्षा रक्षकाला प्रश्न विचारला त्यावेळी वरिष्ठांकडून कोणतीही गाडी आत सोडण्यास नकार देण्यात आल्याचे त्याने सांगितले. त्यावरून अजित पवार गटावर जोरदार टीका झाली. कारण या सुनेत्रा पवार या टेक्सटाईल पार्कच्या प्रमुख आहेत.
बारामतीत सध्या विधानसभा निवडणुकीवरून चांगलेच वातावरण तापले आहे. येथे पवार काका-पुतण्यात ही लढाई आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार या देखील प्रचारासाठी बाहेर पडल्या आहेत. त्या बारामती तालुक्यातील विविध गावांमध्ये जावून मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. तर रेवती सुळे या देखील रस्त्यावर उतरुन युगेंद्र पवार यांचा प्रचार करत आहेत.
त्यामुळे प्रतिभा पवार आणि रवेती सुळे यांना टेक्स्टाईल पार्कच्या गेटवर अर्धा तास थांबवून ठेवण्यामागे राजकीय गणित मांडले जात असल्याचे सांगण्यात आले. बारामती टेक्स्टाईल पार्कचे सीईओ अनिल पवार यांनी गेटवरुन एकही गाडी आतमध्ये सोडू नये, असा आदेश दिल्याची चर्चा आहे. दरम्यान, मी काय इथे चोरी करायला आले आहे का, असा प्रश्न प्रतिभा पवार यांनी उपस्थित केला. यावरून बारामतीत राजकारण तापले आहे.