मुंबई : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राज्यातून गुजरातला गेलेले प्रकल्प, धारावी पुनर्वसन विकास प्रकल्प आदी मुद्यांवरून भाजपावर जोरदार टीका केली. राज्यातील ८ प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेले. त्यामुळे संभाव्य ५ लाख रोजगार हिरावले गेले. ७ लाख कोटी किमतीचे प्रकल्प राज्याबाहेर गेले. राज्याचे सरकार अदानींसाठी काम करत आहे. ते मुंबईतील वांद्रे पत्रकार परिषदेत बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईमधील प्रचारसभेत ‘एक है तो सेफ है’ची घोषणा केली होती. यावरून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. राहुल गांधी म्हणाले, ‘एक है तो सेफ है, ही मोदींची मोदींची घोषणा अगदी योग्य आहे. मोदी आणि अदानी एक आहेत. अदानी सेफ आहेत’ असा त्याचा अर्थ आहे. ‘ती घोषणा अदानींसाठी आहे,’ असा टोलाही विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधानांना लगावला.
धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून टीका
धारावी आणि मुंबईतील जमीन बळकावण्यासाठी मोदी आणि अदानी एक आहेत. अदानी यांना धारावी देऊन याद्वारे लघु आणि सूक्ष्म उद्योगाचे देशातील केंद्र संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आम्ही हा प्रयत्न हाणून पाडू, अशी ग्वाही राहुल गांधी यांनी यावेळी दिली. धारावीच्या जमिनीवर तेथील स्थानिकांची मालकी आहे. एका व्यक्तीसाठी धारावीच्या जमिनीची चोरी आहे, असा त्यांनी गंभीर आरोप केला.
अदानींचा मुंबई बळकावण्याचा प्रयत्न-
मोदींच्या घोषणेवरून टीका करताना राहुल गांधी यांनी सेफ लॉकर आणले. त्यामधून मोदी आणि अदानींचे छायाचित्र, धारावीतील जमीन याचे छायाचित्र बाहेर काढले. राहुल गांधी म्हणाले, अदानी यांनाच विमानतळे, बंदरे आणि धारावी प्रकल्प सर्व कसे मिळतात? कारण अदानी आणि मोदींचे जुने संबंध आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या सहकार्याशिवाय अदानींना धारावी मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. अदानींचा मुंबई बळकावण्याचा प्रयत्न आहे .
सरकार अदानींसाठी काम करते –
ईडी, सीबीआयचा कसा वापर होतो? अदानींना कंत्राट कसे मिळतात? त्यामध्ये मोदी किती सहकार्य करतात हे सर्वांना माहीत असल्याचे गांधी म्हणाले. धारावीतील स्थानिकांच्या हिताला महत्त्व देऊन आम्ही पुनर्विकास करू, असे आश्वासन देतानाच मुंबईतील पूर, मँनग्रोव्ह हा महत्त्वाचा मुद्दा आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. राज्याचे सरकार अदानींसाठी काम करते. राज्यातील तरुणांचे भविष्य अदानी यांनी चोरले आहे, तरुणांनी याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन राहुल गांधींनी केले.
दिशाभूल करण्याचा प्रयत्न
मुख्य मुद्दा रोजगाराचा असताना भाजपा धार्मिक मुद्यावर प्रश्न उपस्थित करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. धारावी, मुंबई आणि महाराष्ट्राच्या नागरिकांचे हक्कांचे जतन करणार आहोत. आमचे सरकार राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
विचारधारेची निवडणूक आहे
पुढे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी म्हणाले, महाराष्ट्राची निवडणूक ही विचारधारेची निवडणूक आहे. ही निवडणूक १ ते २ अब्जाधीश आणि गरीब यांच्यातील निवडणूक आहे. अब्जाधीशांना मुंबईची जमीन ताब्यात घ्यायची आहे. अंदाजानुसार एका अब्जाधीशाला १ लाख कोटी देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी, गरीब, बेरोजगार आणि तरुणांना मदतीची गरज असल्याची आमची विचारसरणी आहे.