लातूर : निवडणूक डेस्क
यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी ज्यांना उमेदवारी दिली आहे, त्यांच्या वयाचा सरासरीने विचार केला असता असे दिसून येते की, सर्वच पक्षांनी सरासरी पन्नाशी ओलांडलेले उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले आहेत.
सर्वांत तरुण उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आहेत, तर सर्वांत वयोवृद्ध उमेदवार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ८६ उमेदवार उतरवले आहेत. त्यांच्या वयाची सरासरी ५१.३ इतकी आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ९५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यांचे सरासरी वय हे ५३.७ इतके आहे. भारतीय जनता पार्टी विधानसभा निवडणुकीत १४९ जागा लढवत आहे. त्यांच्या उमेदवारांचे सरासरी वय ५३.९ इतके आहे.
अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ५९ जागा लढवत आहे. त्यांच्या उमेदवारांच्या वयाची सरासरी ५४ इतकी आहे. काँग्रेस पक्षाचे १०१ उमेदवार निवडणूक लढवत असून, त्यांच्या वयाची सरासरी ५४.५ इतकी आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ८१ जागा लढवत आहे. त्यांच्या उमेदवारांच्या वयाची सरासरी ५४.७ इतकी आहे.