बारामती : प्रतिनिधी
विधानसभेच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये सांगता सभा घेतली. यावेळी अजित पवार यांनी भावनिक होऊ नका. आपल्याला बारामतीमध्ये काम करायचे आहे. बारामतीत दादागिरी, गुंडगिरी चालू द्यायची नाही. कुणाचा लाड करायचा नाही. गाफील राहू नका, असे म्हणत प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी युगेंद्र पवार यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.
भावनिक अजिबात होऊ नका. आपल्याला बारामतीमध्ये काम करायचे आहे. बारामतीत दादागिरी, गुंडगिरी चालू द्यायची नाही. गाफील राहू नका, असे अजित पवार म्हणाले.
जे टेक्सटाईल पार्कमध्ये घडलं त्यामुळे मलाही वेदना झाल्या. मी विरोधक आले तरी त्यांचे काम करतो. काकींचा तर प्रश्नच नाही. घरात कुणी माझ्या विरोधात राहिलं तरी त्यांनाही लोकशाहीचा अधिकार आहे. पण इतक्या खालच्या पातळीला जाऊ नका. सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करु नका. बारामतीची जनता सुज्ञ आहे. मी एवढे सांगितले, काम केले. मी इतके सांगूनही बारामतीकरांनी लोकसभेला झटका दिला. जोर का झटका धीरे से लगा. तुम्ही ठरवले आहे, लोकसभेला सुप्रिया ताई, विधानसभेला दादा. आता तसे करा.