परळी : परळी विधानसभा मतदारसंघामध्ये बोगस मतदान होत असल्याची तक्रार शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केली आहे. याच दरम्यान परळी शहरातील बँक कॉलनी परिसरामध्ये असलेल्या मतदान केंद्रावर उमेदवार मतदान केंद्रातील माहिती घेत असताना अॅडव्होकेट माधव जाधव यांना तीन ते चार जणांनी मारहाण केली आहे.
दरम्यान, गेल्या कित्येक दिवसांपासून उत्सुकता लागलेला दिवस अखेर उजाडला असून राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यानुसार, काही अपवाद वगळता जवळजवळ सर्वच मतदारसंघांत सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केल्याचे चित्र आहे. तर बहुतांश ठिकाणी शांततेत मतदान सुरू असताना काही ठिकाणी काही किरकोळ वाद झाल्याचेही प्रकरण पुढे आले आहे.
मतदान केंद्राबाहेर उभे असताना अॅड. माधव जाधव यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आहेत. दरम्यान या प्रकरणामुळे परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये काहीसा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांना परळीमध्ये मारहाण झाल्यानंतर त्याचे पडसाद परळी विधानसभा मतदारसंघातील घाटनांदुर या ठिकाणी उमटले. घटनांदूरमधील मतदान केंद्रामध्ये मतदान चालू असतानाच काही कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रात घुसून मतदान केंद्र फोडल्याची घटना घडली आहे. काही काळ यामुळे या
ठिकाणचे मतदान थांबवण्यात आले आहे.
उमेदवारांना पोलिस संरक्षण द्या : धनंजय मुंडे
राज्यात विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडत असून, त्या अनुषंगाने परळी विधानसभेचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी परळीतील सर्व प्रमुख उमेदवारांना पोलिस संरक्षण आणि शासकीय कॅमेरा सर्व्हेलन्स देण्यात यावे, अशी आगळीवेगळी मागणी पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.