इस्लामाबाद : काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी अख्खे रेल्वे स्टेशन उडवून दिले होते. यात २५ सैनिक मारले गेले होते. आता पुन्हा तेवढाच शक्तीशाली हल्ला पाकिस्तानी सैन्यावर करण्यात आला आहे. यात १७ जवानांचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागातील बन्नू जिल्ह्याच्या जानिखेल भागातील चौकीवर भीषण आत्मघाती हल्ला करण्यात आला. बॉम्बस्फोट आणि गोळीबारात पाकिस्तानचे १७ जवान ठार झाले आहेत. तहरीक ए तालिबान पाकिस्तानसी सहकारी संघटना हाफिज गुल बहादुर ग्रुप (एचजीबी)ने याची जबाबदारी घेतली आहे. भारताला दहशतवादाने त्रस्त करणा-या पाकिस्तानला देखील आता हेच दहशतवादी पोखरू लागले आहेत. भारताविरोधात वापरेले शस्त्र आता पाकिस्तानींचाच जीव घेऊ लागले आहेत. यातून आता पाकिस्तान बाहेर पडणे कठीण झाले असून येत्या काळात असेल हल्ले पाकिस्तानला झेलावे लागण्याची शक्यता आहे.
मंगळवारी सायंकाळी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन सुरक्षा चौकीवर नेऊन आदळले. यात झालेल्या स्फोटात चौकी उध्वस्त झाली. येथे तैनात असलेले १२ सैनिक जागीच ठार झाले. तर अनेक जखमी झाले. आता हा आकडा वाढून १७ वर गेला असल्याचे तेथील वृत्तांत म्हटले आहे. स्फोटानंतर लगेचच दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार सुरू झाला. या चकमकीत सहा दहशतवादी मारले गेले. दहशतवाद्यांना चौकीत घुसता आले नाही. परंतू, स्फोटामुळे मोठा विध्वंस झाल्याचे लष्कराने सांगितले.