मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील २८८ मतदारसंघातील विधानसभेच्या निवडणुकांसाठी घेण्यात आलेल्या मतदानानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. या आकडेवारीनुसार महाविकास आघाडी व महायुती यांच्यात काँटे की टक्कर होत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. चाणक्य स्ट्रॅटेजी, इलेक्ट्रोल एज, पोल डायरी आणि मॅट्रीझ या चार संस्थांकडून मतदानानंतरचे एक्झिट पोल अंदाज वर्तवण्यात आला आहे.
त्यानुसार भाजपला सर्वाधिक ७७ ते १०८ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे तर ४ पैकी तीन संस्थांकडून महायुतीला सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला तर एका संस्थेनेच महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील, असा निष्कर्ष काढला. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीत कॉंटे की टक्कर पाहायला मिळत आहे. आता निकालासाठी २३ नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे.
राज्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विधानसभा निवडणूक एक्झिट पोल अंदाज समोर आले आहेत. त्यामध्ये महायुतीचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. मात्र, इलेक्टोरल एज या सर्वेक्षण संस्थेकडून महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला. या सर्वेक्षणानुसार महाविकास आघाडीला १५० जागांवर यश मिळू शकते तर २० जागा इतर पक्ष व अपक्षांच्या पारड्यात जाऊ शकतात. तीन संस्थांकडून महायुतीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येते. त्यानुसार महायुतीला १५२ ते १६० जागांवर भाजपा महायुतीला यश मिळण्याची शक्यता आहे.
या सर्वच सर्वेक्षणात भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता दर्शवणा-या इलेक्ट्रोरल एजच्या सर्वेक्षणानुसार भाजपचे सर्वाधिक ७८ जागा जिंकेल असा अंदाज आहे. त्यामुळे राज्यात भाजपने १४८ जागांवर निवडणूक लढवली असता ७८ ते १०८ जागांवर भाजपला यश मिळू शकते. मात्र, गत २०१९ च्या निवडणुकीत भाजपला १०५ जागांवर यश मिळाले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता असून त्यांच्या जागा घटणार असल्याचे सर्वेक्षणातून दिसून येत आहे.