मुंबई : प्रतिनिधी
प्रहार संघटनेचे नेते आणि विधानसभा निवडणुकीआधी परिवर्तन महाशक्ती स्थापन करणारे बच्चू कडू यांनी दावा केला आहे की, महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही आघाड्यांकडून आम्हाला संपर्क केला जात आहे. मात्र आमचे अजून काहीही ठरलेले नाही. एकदा कल हातात आला की आम्ही निर्णय घेऊ, असे कडू यांनी म्हटले आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या (२३ नोव्हेंबर) जाहीर होणार आहे.
महाराष्ट्रात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली तर अपक्ष आणि छोट्या पक्षांना मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे.
निकालानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्येही गोंधळाची स्थिती आहे. त्यामुळे निकाल काय असणार याची उत्सुकता आहे. दोन्ही प्रमुख आघाड्यांना बहुमत मिळाले नाही तर मनसे, वंचित, परिवर्तन महाशक्ती, बहुजन विकास आघाडी, शेतकरी कामगार पक्ष, एमआयएम या छोट्या पक्षांशी संपर्क केला जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जे सत्ता स्थापन करतील त्यांना पाठिंबा देऊ असे म्हटले आहे.
तर विदर्भातीलच नेते बच्चू कडू यांनी तिस-या आघाडीचा पाठिंबा कोणाला असणार याचा खुलासा केला आहे.
महाविकास आघाडी की महायुती जनतेचा कौल कोणाला हे उद्या जाहीर होणार आहे. राज्याचा कारभारी कोण होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. अनेक मतदारसंघांत चुरशीच्या लढती झाल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी यांना पूर्ण बहुमत मिळाले नाही तर छोटे पक्ष आणि अपक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी दोन्ही बाजूंनी तयारी सुरू झाली आहे.