17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeनांदेडलोकसभा पोटनिवडणुकीत प्रा. रवींद्र चव्हाण यांची सरशी

लोकसभा पोटनिवडणुकीत प्रा. रवींद्र चव्हाण यांची सरशी

अटीतटीच्या लढतीत भाजपचे संतुक हंबर्डे यांचा पराभव

नांदेड : प्रतिनिधी
राज्याच्या विधानसभा निवडणुकीसोबतच नांदेड लोकसभेची निवडणूक पार पडली. नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाल्याने येथे पोटनिवडणूक झाली. विधानसभा निवडणुकीत एकीकडे महायुतीची सरशी झालेली असताना लोकसभा पोटनिवडणुकीत मात्र, वसंत चव्हाण यांचे चिरंजीव प्रा. रवींद्र चव्हाण यांचा १५५७ मतांनी विजय झाला. वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर कॉंग्रेस पक्षाने त्यांचे चिरंजीव प्रा. रवींद्र चव्हाण यांना मैदानात उतरवले होते. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

खा. वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर कॉंग्रेस पक्षाने तात्काळ बैठक घेऊन त्यांच्या जागेवर त्यांचेच चिरंजीव प्रा. रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर भाजप कोणाला उमेदवारी देणार याकडे लक्ष लागले होते. त्यावेळी माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि खा. अशोक चव्हाण यांनीही निवडणूक लढण्यास नकार दिला होता. त्यानंतर उमेदवारीवरून बराच खल झाला. त्यानंतर एक सुशिक्षित आणि वेगळा चेहरा म्हणून संतुक हंबर्डे यांना भाजपने उमेदवारी दिली होती. प्रा. रवींद्र चव्हाण आणि संतुक हंबर्डे यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत अखेर प्रा. रवींद्र चव्हाण यांनी दणदणीत विजय मिळविला. त्यामुळे भाजपला पोटनिवडणुकीत धक्का बसला.

वायनाडमधून प्रियंका गांधी यांचा मोठा विजय
केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीत कॉंग्रेसने प्रियंका गांधी यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत प्रियंका गांधी यांनी तब्बल ३ लाख ३६ हजार मतांनी मोठा विजय मिळविला. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी २ मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. त्यापैकी वायनाडमधून त्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे येथे पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीत प्रियंका गांधी यांनी मोठा विजय मिळविला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR