गडचिरोली : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या आधी गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली. गडचिरोलीतील अहेरीमध्ये मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांचीच लेक भाग्यश्री आत्राम यांना शरद पवारांनी उमेदवारी दिली. मात्र तिथे धर्मरावबाबा आत्राम यांचा १६ हजार ८१४ मतांनी विजय झाला आहे.
भाग्यश्री आत्राम यांना ३५ हजार ७६५ मते मिळाली आहेत. या निकालावर प्रतिक्रिया देताना अजित पवार गटाचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवारांचे राजकारण संपल्याचे धर्मराव बाबा आत्राम म्हणाले.
शरद पवार यांनी आमच्या घरावर वार केला. लोकांनी त्यांच्या घरावर वार केला. त्यांचे राजकारण संपले आहे. त्यांची काम करण्याची पद्धत आणि त्यांचे राजकारण संपले. ते आता आमच्याकडे येतील, असे विधान धर्मरावबाबा आत्राम म्हणाले.
अहेरी मतदारसंघात झालेल्या विजयावर आत्राम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझा विजय होणारच होता. ते मी आधीच सांगितले होते. चौथ्या नंबरवर माझी मुलगी येईल असे मी सांगितले होते पण तिस-यावर आली. मी आधीच सांगितले होते २०० च्या वर आमच्या महायुतीच्या जागा येतील आणि तसेच झाले आमचं सरकार स्थापन होईल. त्यांच्या पक्षाचं ते पाहतील. आम्हाला ४१ जागा मिळाल्या. आम्ही अपेक्षा केली नव्हती त्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या, असे धर्मरावबाबा आत्राम म्हणाले.
सरकारने जाहीर केलेल्या योजनांचा चांगला फायदा झाला. लाडका भाऊ, लाडकी बहीण या सगळ्या योजनांचा चांगला फायदा झाला. लोकांनी आम्हाला निवडून दिले. आता विरोधकांनी पाच वर्षे विरोधी बाकावर बसायचं. ते आता बसतील. त्यांचं काम ते करतील आमचं काम आम्ही करू. सगळे मोठे नेते पडले. आता ते कुठेतरी थांबले पाहिजे. आमचे नेते पडतील असे ते बोलत होते मात्र ते निवडून आले, असे आत्राम यांनी म्हटले आहे.