पुणे : प्रतिनिधी
अजित पवार यांना त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी घेत आव्हान दिले होते. मात्र अजित पवार यांना पुन्हा एकदा या मतदारसंघावर आपले वर्चस्व सिद्ध करत मोठा विजय मिळवला आहे. या वेळी बारामतीमध्ये अजितदादांच्या विरोधात उमेदवार देऊन तुतारी गटाने चूक केली होती. हे कबूल करण्याचे औदार्य सुप्रिया सुळे यांनी दाखवावे अशी टीका अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी सुप्रिया सुळेंवर केली आहे.
पुढे बोलताना मिटकरी म्हणाले, लोकशाहीमध्ये लोकांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. ती दानत फक्त अजित दादांमध्ये होती की, बारामती लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतरसुद्धा जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य केला. माझ्याकडून चूक झाली हे त्यांनी प्रामाणिकपणे कबूल केले. बारामतीमध्ये अजितदादांच्या विरोधात उमेदवार देऊन तुतारी गटाने चूक केली होती. हे कबूल करण्याचे औदार्य सुप्रिया सुळे यांनी दाखवावे, एवढी आमची अपेक्षा आहे असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांनी १ लाख १६ हजारांच्या मताधिक्यासह ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
आमदार अमोल मिटकरी यांनी सुप्रिया सुळेंसह अमोल कोल्हे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. जी व्यक्ती खालच्या पातळीवर जाऊन टीका करत होती, त्या खासदार कोल्हेंना आम्हाला विचारायचं आहे, ज्या पद्धतीने गद्दारीचा डाग, काळा डाग, गुलाबी जॅकेट असे तुम्ही बोलत होता तर आज तुम्ही मीडियासमोर येऊन का धमकी दाखवू शकत नाही.
बारामती मतदारसंघातून अजित पवार यांना एकूण १ लाख ९६ हजार ६४० मते मिळाली, तर युगेंद्र पवार यांना अवघ्या ८० हजार ४५८ मतांवर समाधान मानावे लागले आहे.