शिमला : उद्धव ठाकरेंच्या पराभवावर बोलताना कंगनाने दानवांचा पराभव झाला आहे अशा शब्दांत आपली प्रतिक्रिया नोंदवली. तसेच आपल्या घरावर करण्यात आलेल्या कारवाईचा उल्लेख करत त्यांची बुद्धी भ्रष्ट झाल्याचे दिसत होते असेही म्हटले. आमच्या पक्षासाठी हा ऐतिहासिक विजय आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते उत्साहित आहोत. संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतातील जनतेचे आम्ही आभारी आहोत असे कंगना रानावत म्हणाली आहे. मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल? असे विचारले असता कंगनाने पक्ष यासंबंधी निर्णय घेईल असे सांगितले. आमच्याकडे नेतृत्व करण्यासाठी एकापेक्षा एक लोक आहेत असे सांगितले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकीकडे महायुतीचा मोठा विजय झाला असताना महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. महायुतीला २३४ जागा मिळाल्या असून भाजपला १३२, शिवसेना ५७ आणि राष्ट्रवादी ४१ जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीला फक्त ५० जागा मिळाल्या असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त २० जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला १६ आणि राष्ट्रवादीला १० जागा जिंकता आल्या. दरम्यान या निकालावर अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रानावतने प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरेंचा इतका वाईट पराभव होईल याची तुम्हाला अपेक्षा होती का? या प्रश्नावर कंगना म्हणाली, हो मला अपेक्षा होती. इतिहास याचा साक्षीदार आहे आणि माझे अनेक रीलही व्हायरल होत आहेत की आपण देव आणि दानवांना कसे ओळखतो. जे महिलांची अब्रू उतरवतात, ते दैत्य असतात. दुसरीकडे महिलांना ३३ टक्के आरक्षण, धान्य, गॅस सिलिंंडर दिले आहे. त्यावरुन कोण देव आहे आणि कोण दैत्य हे समजत आहे. त्यामुळे दैत्यांचे तेच झाले जे नेहमी होते. त्यांचा पराभव झाला.
पुढे ती म्हणाली, महाभारतात एकच कुटुंब होते, पण किती फरक होता. सर्व भाऊ होते. जे महिलांचा अपमान करतात. माझे घर तोडण्यात आले. घाणेरड्या शिव्या देण्यात आल्या. त्यांची बुद्धी भ्रष्ट झाल्याचे दिसत होते.