मुंबई : मुख्यमंत्री पदाबाबत तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेतली. त्यावरून कोणताही वाद नाही, किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल असे शिवसेनेचे नेते व मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील अतिरेकी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली करण्याच्या शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आले होते. मात्र या कार्यक्रमादरम्यान, या दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाला नाही. त्यांच्यातील तणाव स्पष्ट जाणवत होता.
त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याची चर्चा होती. शिवसेना शिंदे गटाचे नेते दिपक केसरकर यांनी मात्र याचा इन्कार केला. येत्या काही दिवसांमध्ये नवीन सरकार स्थापन होईल. उद्या भाजपची गटनेते पदाबाबत बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तिन्ही नेते एकत्र बसतील. चर्चा करतील, त्यानंतर पक्षश्रेष्ठींकडे जातील. त्यानंतर पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील.
त्याप्रमाणे महाराष्ट्राचे सरकार स्थापन होईल. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना असतात की, आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा पंरतु तिन्ही पक्षांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, जो निर्णय पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह घेतील तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य असेल असे केसरकर यांनी स्पष्ट केले.