मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून ३ दिवस झाले तरी मुख्यमंत्रिपदासाठी सुरू असलेल्या रस्सीखेचीमुळे नवीन सरकारची प्रतीक्षा संपलेली नाही. भाजपा आमदार व संघ परिवार मुख्यमंत्री भाजपाचाच झाला पाहिजे यावर ठाम असून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता वाढत चालली आहे तर दुसरीकडे शिंदेंची शिवसेना आपला आग्रह सोडण्यास तयार नाही.
यामुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना हस्तक्षेप करावा लागणार अशी चिन्हं आहेत. मुख्यमंत्रिपद मिळणार नसेल तर उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सहभागी होण्यास एकनाथ शिंदे इच्छुक नसल्याने त्यांची नाराजी दूर करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळाला असल्याने बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही शिंदे यांच्याकडेच काही काळ नेतृत्व ठेवावे, असा शिंदेंच्या आमदारांचा आग्रह आहे तर मागच्या वेळी दुप्पट आमदार असूनही शिंदे यांना मुख्यमंत्री पद देण्यात आले होते. या वेळी त्यांनी संख्याबळ मान्य करून भाजपाला मुख्यमंत्री पद दिले पाहिजे, अशी भाजपची भूमिका आहे.
विधानसभा विजयात मोठा हातभार असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी ठाम भूमिका घेतली आहे. यासाठी एकनाथ शिंदेंची समजूतही काढण्यात येत असल्याचे समजते. फडणवीस यांना मुख्यमंत्री पद द्यावे आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे. शिंदे यांच्याकडे काही महत्त्वाची खाती तसेच केंद्रात आणखी एक मंत्रिपद देण्याचा प्रस्ताव पुढे करण्यात आला असला तरी शिंदे यांनी त्याला अजून कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचे समजते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या मुंबईत येण्याची शक्यता आहे.
निवडणुकीपूर्वी शिंदेंना शब्द दिला होता का?
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाच्या केंद्रीय नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता की नाही यावर सध्या उलट-सुलट दावे केले जात आहेत. शिंदे गटाच्या एका वरिष्ठ नेत्याने असा शब्द दिल्याचे सांगितल्याचे वृत्त आज प्रसिद्ध झाले होते; परंतु केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी याचा इन्कार करताना, शिंदे यांना कोणतेही आश्वासनं दिलेले नव्हते फडणवीसचं मुख्यमंत्री झाले पाहिजेत, अशी भूमिका आज घेतली.