श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक पडसाद उमटले. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका का होत नाहीत, यावरून विरोधकांनी सत्ताधा-यांना घेरण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. अद्यापही या मुद्यावरून विरोधक केंद्र सरकारला प्रश्न विचारतात. यावर राज्यपाल मनोज सिन्हा यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया देताना जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका घेण्यासाठी तयार आहोत, असे म्हटले आहे.
जम्मू येथील एका कार्यक्रमात बोलताना मनोज सिन्हा म्हणाले की, निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीरकडून व्यवस्थांबाबत जी काही माहिती मागवली होती, ती त्यांना देण्यात आली आहे. मी सांगू इच्छितो की, जेव्हा निवडणूक आयोग सांगेल, तेव्हा जम्मू काश्मीर प्रशासन निवडणुका घेण्यास तयार आहे, असे मनोज सिन्हा यांनी सांगितले. जम्मू काश्मीरमध्ये अनेक समस्या होत्या, अडथळे होते, कमतरता होत्या, त्या टप्प्याटप्प्याने दूर करून विकासमार्गावर आता जम्मू काश्मीर वाटचाल करत आहे असे मनोज सिन्हा यांनी नमूद केले.
जम्मू काश्मीर चार वर्ष अंधारात
जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर हा प्रदेश अंधारात होता. चार वर्षे अथक प्रयत्नातून आता या प्रदेशाची वाटचाल उज्ज्वल भविष्याकडे सुरू झाली आहे. स्थानिक जनतेच्या आशा, आकांक्षा पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असे मनोज सिन्हा यांनी सांगितले. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका यशस्वीरित्या राबवल्यानंतर राज्यपालपद सोडणार असल्याचे संकेत मनोज सिन्हा यांनी दिले.