नाशिक : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकाही जागेवर यश मिळवता आलेले नाही. राज ठाकरे यांच्या सर्वच उमेदवारांचा दारुण पराभव झाला. त्यानंतर आता महापालिका निवडणुकीत मनसेला सोबत घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुतोवाच दिले आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत जिथे शक्य असेल, तिथे त्यांना सोबत घेता आले तर आम्ही प्रयत्न करू असे सूचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावरुन आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंनामहायुतीत घेण्याबाबत भाष्य केले आहे.
मनसे आता महायुतीमध्ये येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. राज ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चेनंतर महायुतीमध्ये घेतले जाईल अशी चर्चा सुरु आहे असे पत्रकारांनी म्हटले. त्यावर राज ठाकरेंना महायुतीत घेऊन फायदा नसल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले. रामदास आठवले हे नाशिकमध्ये बोलत होते.
राज ठाकरेंची हवा गेली
मला वाटते की राज ठाकरेंची जी हवा आहे ती या निवडणुकीत गेलेली आहे. राज ठाकरे १४३ जागा लढले. माझ्याशिवाय सरकारच येणार नाही अशा स्वप्नामध्ये ते राहिले. पण त्यांचे स्वप्न भंग झालेलं आहे. बाळासाहेब ठाकरे देखील म्हणायचे की माझ्या सभांना एवढी गर्दी होते तरी मते मिळत नाहीत. छगन भुजबळ हे माझगावमधून निवडून यायचे पण बाळासाहेबांच्या सभांना प्रचंड गर्दी असायची. इंदिरा गांधींपेक्षा मोठ्या सभा त्यांच्या व्हायच्या. तशा राज ठाकरेंच्या सभा मोठ्या होतात. पण लोक ऐकायला येतात आणि निघून जातात. ते काय मते देण्यासाठी त्यांच्यासोबत राहत नाहीत. त्यांनी असा प्रयत्न केला आहे पण राज ठाकरे महायुतीमध्ये येतील असे मला वाटत नाही असे रामदास आठवले म्हणाले.