29.7 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeमहाराष्ट्रसंविधानाच्या मूल्य, प्रतिष्ठेवर पाय देऊन राज्य चालवले जाते

संविधानाच्या मूल्य, प्रतिष्ठेवर पाय देऊन राज्य चालवले जाते

ठाकरे गटाचा भाजपावर निशाणा

मुंबई : प्रतिनिधी
परभणीत संविधानाची विटंबना झाली म्हणून दंगल उसळली. गेल्या दहा वर्षांत संविधानाच्या मूल्य आणि प्रतिष्ठेवर पाय देऊन राज्य चालवले जात आहे, हीच खरी संविधानाची विटंबना आहे आणि लोक धर्माच्या अफूची गोळी खाऊन गुंग झाले आहेत. खुशामतखोर, भेकड, स्वार्थी, लंपटांच्या अंधभक्त मेळ्याने भारतीय राज्यघटनेचा पाया हादरला आहे. तरीही संसदेत राज्यघटनेवर चर्चा सुरू आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राज्यघटनेबाबत भाष्य केले आहे. या अग्रलेखात ठाकरे गट म्हणतो, घटना समितीने आपल्या कामकाजाला ९ डिसेंबर १९४६ या दिवशी प्रारंभ केला. जगातील सर्वात नव्या आणि सर्वात मोठ्या लोकशाहीचे घटनात्मक स्वरूप विशद करताना घटना समितीचे हंगामी अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा यांनी त्या ऐतिहासिक दिवशी आपल्या उद्घाटनपर भाषणात जोसेफ स्टोरी यांचे शब्द उद्धृत केले.

उच्च कोटीचे कौशल्य आणि निष्ठा असलेल्या वास्तुविशारदांनी ही इमारत उभारलेली आहे. या वास्तूचा पाया भक्कम आहे. तिची दालने सुंदर आणि उपयुक्त आहेत. तिची सारीच रचना मोठ्या शहाणपणाने आणि व्यवस्थित केलेली आहे. बाहेरून तिच्यावर कोणीही हल्ला करू नये इतकी तिची तटबंदी मजबूत आहे, परंतु या वास्तूच्या ‘चौकीदारां’नी म्हणजे संरक्षकांनीच जर मूर्खपणा केला, भ्रष्टाचार आचरला किंवा तिच्याकडे लक्षच दिले नाही, तर ती एका तासाच्या आत कोसळून पडेल.

लोक या वास्तूचे खरे संरक्षक आहेत. नागरिकांची सप्रवृत्ती, सेवाभाव आणि बौद्धिक क्षमता यांतून प्रजासत्ताक देशाची उभारणी होत असते. पंचायत सभांमधून जेव्हा शहाण्या लोकांची हकालपट्टी होते, तेव्हा या प्रजासत्ताकाचे पतन होते. देशाप्रति प्रामाणिक असणारे धैर्यवान संसदेत उरत नाहीत. जेव्हा हे प्रजासत्ताक दुस-यांच्या हाती जाते, तेव्हा त्याचा विनाश कोणीही टाळू शकत नाही. कारण हे चारित्र्यभ्रष्ट लोक नागरिकांचा विश्वासघात करता यावा यासाठी भ्रष्ट राज्यकर्त्यांची स्तुतिस्तोत्रे गाऊ लागतात! हे सच्चिदानंद सिन्हा यांचे शब्द खरोखर दूरदर्शी ठरले, असे सांगत ठाकरे गटाने भाजपावर निशाणा साधला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR