ग्वाल्हेर : वृत्तसंस्था
भारतातील अब्जाधीश उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. नेहमी ते सोशल मीडियावर आगळ्यावेगळ्या पोस्ट करत असतात. त्या पोस्ट व्हायरल होतात. त्यांनी आता १२वीच्या मेधांश त्रिवेदी या विद्यार्थ्याचे संशोधन पोस्ट केले आहे. त्या विद्यार्थ्याने कमालीचा ड्रोन बनवला आहे. त्याच्या त्या संशोधनाबाबत आनंद महिंद्रा यांनी मोठी गोष्ट सांगितली आहे. ती सर्वांना विचार करायला प्रवृत्त करत आहे.
आनंद महिंद्रा यांनी विद्यार्थ्याच्या इनोव्हेशनचे कौतूक केले. मध्य प्रदेशातील ग्वालियरमधील सिंधिया शाळेचा हा विद्यार्थी आहे. त्याचा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी आपल्या ‘एक्स’ अकाउंटवरुन ट्विट केला. त्या व्हिडिओमध्ये एक खास ड्रोन आहे. हा ड्रोन हवेत उडताना दिसत आहे. त्या ड्रोनवर एक व्यक्तीही बसला आहे. सिंधिया स्कूलच्या मेधांश त्रिवेदी या विद्यार्थ्यांने हा ड्रोन बनवला आहे. या ड्रोनला ‘एमएलडीटी०१’ नाव दिले आहे. आनंद महिंद्रा यांनी पोस्टमध्ये विद्यार्थ्याचे गजब कौतूक केले आहे.
महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी ‘ड्रोन कॉप्टर’ बनवणा-या मेधांश याचे कौतूक करताना लिहिले आहे की, या संशोधनात नावीन्यपूर्ण असे फारसे नाही. कारण त्याबाबतची माहिती इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे. परंतु या विद्यार्थ्यांची अभियांत्रिकीची आवड आणि काम पूर्ण करण्याची वचनबद्धता उल्लेखनिय असून मेधांश याने हा ड्रोन तीन महिन्यांत बनवला. हा ड्रोन बनविण्यासाठी सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. हे ड्रोन सुमारे ८० किलो वजनाच्या व्यक्तीला घेऊन सहा मिनिटे हवेत उडू शकते. ड्रोन १.८ मीटर लांब आहे. त्याची क्षमता ४५ अश्वशक्ती आहे.