व्हॅटिकन सिटी : वृत्तसंस्था
जागतिक पातळीवर सध्या अनेक देश आर्थिक परिस्थितीशी झुंज देत आहेत. अमेरिका आणि चीन, यासारख्या जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था विकासाचा वेग वाढवण्यासाठी धडपडत आहेत तर कॅथॉलिक चर्चचे मुख्यालय आणि जगातील सर्वात लहान देश म्हणून ओळखला जाणारा व्हॅटिकन सिटी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. जगातील सर्वात लहान देश आणि कॅथॉलिक चर्चचे मुख्यालय असलेल्या व्हॅटिकन सिटीची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे.
व्हॅटिकन सिटीची ऑपरेटिंग तूट ८७ दशलक्ष डॉलर्सवर पोहोचली असून गेल्या एका वर्षात त्यात ५.३ दशलक्ष डॉलर्सनी वाढ झाली. विशेष म्हणजे व्हॅटिकन सिटीने यापूर्वी कधीही इतके कर्ज घेतले नव्हते पण आता आर्थिक परिस्थितीमुळे सेवानिवृत्त धर्मगुरू व कर्मचा-यांना पैसे देणेही कठीण होत आहे. व्हॅटिकन सिटीचे उत्पन्न अनेक कारणांमुळे घटले असून यापैकी सर्वात मोठे कारण म्हणजे जगभरातून मिळणा-या देणग्यांमध्ये झालेली घट आहे.
व्हॅटिकन सिटीच्या दुरवस्थेसाठी अनेक लोक २०१३ मध्ये २६६ वे पोप बनलेल्या पोप फ्रान्सिस यांच्या नेतृत्वाला दोष देत आहेत. यापूर्वी २०१२ मध्ये युरोपियन मंदीमुळे व्हॅटिकन सिटीवरही वाईट परिणाम झाला होता. त्यानंतर, नऊ वर्षांनंतर २०२१ मध्ये कोविड-१९ ने त्यांच्यावर पुन्हा परिणाम करण्यास सुरुवात केली. कमी देणग्यांमुळे व्हॅटिकन सिटीला गेल्या एक वर्षापासून मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
दरवर्षी सुमारे पाच दशलक्ष भाविक व्हॅटिकन सिटीला भेट देतात तर करोनापूर्वी ही संख्या सुमारे ७० लाख होती. देशाच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा पर्यटनातून येतो. व्हॅटिकन सिटी संकटात सापडल्याचे स्वत: पोप फ्रान्सिस यांनी मान्य केले आणि म्हणाले की, सध्याची व्यवस्था भावी पिढ्यांना पेन्शन सुविधांची हमी देत नाही. आपण गंभीर समस्येला तोंड देत आहोत आणि ही समस्या वेळीच सोडवली नाही तर परिस्थिती आणखी बिकट होईल.