खजुराहो : राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील जलस्रोतांच्या विकासाबाबत दिलेल्या योगदानाकडे काँग्रेसने साफ दुर्लक्ष केले अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. मोदी यांच्या हस्ते मध्य प्रदेशमधील केन-बेतवा नदी जोड प्रकल्पाचे भूमिपूजन झाले.
खजुराहो येथील कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेतील भाषणात काढलेले उद्गार व त्याबाबत विरोधी पक्षांनी केलेली टीका या पार्श्वभूमीवर मोदी यांनी आंबेडकर व काँग्रेसबाबत वक्तव्य केले. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खांडवाच्या ओकारेश्वर फिरत्या सोलार प्रकल्पाचे उद्घाटन केले. मोदी म्हणाले की, उत्तम व्यवस्थापन असलेले व पुरेसे जलस्रोत असलेले देशच २१ व्या शतकात मोठी प्रगती करू शकतात. डॉ. आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे देशातील धरणांची बांधकामे व जलस्रोतांचे संवर्धन अधिक उत्तम प्रमाणात होऊ शकले आहे.
देशात जलसंवर्धनाची वाढती गरज लक्षात ठेवून काँग्रेसने त्या दिशेने कधीही पावले टाकली नाहीत. जलसंवर्धनाच्या क्षेत्रासाठी डॉ. आंबेडकरांनी जी कामगिरी बजावली, त्याकडे काँग्रेसने कानाडोळा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जलसुरक्षा हे २१ व्या शतकातील सर्वांत मोठे आव्हान आहे. मध्य प्रदेशमधील दहा जिल्ह्यांतील ४४ लाख लोक व उत्तर प्रदेशमधील २१ लाख लोकांना केन-बेतवा नदीजोड प्रकल्पामुळे पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. शेतक-यांसाठीही उपयोगी असलेल्या या प्रकल्पासाठी ४४६०५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.