मुंबई : प्रतिनिधी
मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीच्या सर्वेक्षणाचे निकष अंतिम झाले असून, सर्वेक्षण करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून राज्य सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. दरम्यान, आयोगाचे सदस्य बालाजी सागर किल्लारीकर यांनी सर्वच जातींचे मागासलेपण तपासावे, अशी मागणी लावून धरून आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. विशेष म्हणजे काल राजीनामा देणारे किल्लारीकर आज सकाळीच शरद पवारांच्या भेटीला पोहोचले. त्यामुळे सर्वेक्षणाचा वाद वाढण्याची शक्यता आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा देणारे बी. एल. किल्लारीकर शरद पवार यांच्या भेटीला पोहचले. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. जातनिहाय जातगणना तसेच जातींचे सामाजिक मागासलेपण तपासावे, अशी किल्लारीकरांची मागणी आहे. मात्र, त्यावर मतैक्य न झाल्याने काल किल्लारीकर यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आज त्यांनी पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून सर्व जातींचे सामाजिक आणि आर्थिक मागासपण तपासण्यासाठी सर्वेक्षण झाले पाहिजे, हे मी पवार साहेबांना सांगितले, असे त्यांनी सांगितले.
जातनिहाय जनगणनेला पवारांचा पाठिंबा : किल्लारीकर
बालाजी किल्लारीकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करण्याच्या आपल्या भूमिकेला शरद पवार यांचा पाठिंबा असल्याचे सांगितले. या सगळ््यानंतर शरद पवार राज्य सरकारकडे एखादा प्रस्ताव मांडतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.