29.1 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeराष्ट्रीय४ राज्यांचा ३ डिसेंबर रोजी फैसला

४ राज्यांचा ३ डिसेंबर रोजी फैसला

नवी दिल्ली :
पाच राज्यांच्या विधानसभेची नुकतीच निवडणूक पार पडली. आता या पाचपैकी मिझोरम वगळता ४ राज्यांच्या निवडणुकीचा रविवार, दि. ३ डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे. त्यानंतर सोमवारी मिझोरमचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, मध्य प्रदेश, राजस्थानात कॉंग्रेस, भाजपमध्ये जोरदार चुरस आहे, तर छत्तीसगड आणि तेलंगणातही अनुक्रमे भाजप-कॉंग्रेस आणि कॉंग्रेस-टीआरएसध्ये लढत झाली. मात्र, या दोन छोट्या राज्यांत कॉंग्रेसच बाजी मारेल, असा एक्झिट पोलचा अंदाज आहे तर मध्य प्रदेश, राजस्थानात कॉंग्रेस आणि भाजपनेही विजयाचा दावा केला आहे.

त्यामुळे या निवडणुकांत आता कोण बाजी मारणार, याचा फैसला आता उद्या होणार आहे. पाचही राज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून मतमोजणी स्थळांवर कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. रविवारी सकाळी ८ वाजता चारही राज्यांत मतमोजणीला सुरवात होणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर या पाच राज्यांची निवडणूक झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे मिनी लोकसभा म्हणून पाहिले जाते. कारण या निवडणूक निकालानुसारच पुढील चार महिन्यांत होणा-या लोकसभा निवडणुकीत कल ठरू शकतात, असा राजकीय तज्ज्ञांचा कयास आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मिनी लोकसभा गृहीत धरून निवडणूक लढविली. मिझोरम वगळता चारही राज्यांत कॉंग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत पाहायला मिळाली. तेलंगणात बीआरएसनेही जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे कोणत्या राज्यात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

ही निवडणूक भाजप आणि कॉंग्रेसने प्रतिष्ठेची केली होती. यात कॉंग्रेसने बाजी मारल्यास भाजपला फार मोठा धक्का बसू शकतो, तर कॉंग्रेसला लाभ झाल्यास आगामी लोकसभा निवडणुकीसाठी हा निकाल फायद्याचा ठरू शकतो. यात कोण, कुठे बाजी मारणार, हे उद्या स्पष्ट होणार अहे.
चारही राज्यांत मतदान केंद्रांच्या संख्येनुसार मतमोजणीचा टप्पा ठरविण्यात आला. यात पोस्टल मतपत्रिकांच्या मोजणीसाठी स्वतंत्र टेबल असणार आहे. प्रत्येक फेरीच्या मोजणीनंतर निकाल जाहीर केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्ट्राँग रूममधून मतमोजणी हॉलमध्ये मशीन पोहोचण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्र मार्ग/व्यवस्था निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये सीसीटीव्ही कव्हरेज असेल. मतमोजणी सभागृहात निवडणूक निरीक्षकांव्यतिरिक्त कोणालाही मोबाईल फोन घेऊन जाण्यास मनाई आहे.

ईटीपीबीएमएसशी जोडलेले रिटर्निंग ऑफिसर, सहाय्यक रिटर्निंग ऑफिसर आणि मतमोजणी पर्यवेक्षकच ईटीपीबीएमएस सिस्टम उघडण्यासाठी ओटीपीसाठी मोबाइल घेऊ शकतील आणि त्यानंतर ते मोबाइल बंद करून निरीक्षक, रिटर्निंग ऑफिसर आणि सहाय्यक यांच्याकडे जमा करतील. राजस्थानातील मतमोजणीच्या तयारीबाबत मुख्य निवडणूक अधिकारी प्रवीण गुप्ता म्हणाले की, राज्यातील १९९ विधानसभा मतदारसंघांसाठी ३३ जिल्हा मुख्यालयातील ३६ केंद्रांवर ३ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल.

मध्य प्रदेश, राजस्थानात चुरस
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपविरुद्ध कॉंग्रेस अशी लढत झाली आहे. राजस्थानात सध्या कॉंग्रेसची, तर मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांत सत्ता मिळविण्यासाठी दोन्ही पक्षांनी जोरदार प्रयत्न केले. त्यामुळे दोन्ही राज्यांत चुरस वाढली. त्यामुळे एक्झिट पोललाही ठोस अंदाज बांधता आला नाही. त्यामुळे या दोन्ही राज्यांत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता आहे.

मिझोरमचा निकाल उद्या
पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबर रोजी लागणार होता. मात्र, सर्व मतदान पार पडल्यानंतर काल निवडणूक आयोगाने मिझोरममधील निकालाची तारीख बदलली. कारण ३ डिसेंबर रोजीच्या रविवारला मिझोरमच्या लोकांसाठी विशेष महत्त्व आहे. त्यामुळे निकाल लांबविण्याची विनंती करण्यात आली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने मिझोरमची मतमोजणी ३ डिसेंबरऐवजी ४ डिसेंबर रोजी होईल, असे जाहीर केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR