29.7 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्याहून कुंभमेळ्यासाठी भारत गौरवची विशेष रेल्वे

पुण्याहून कुंभमेळ्यासाठी भारत गौरवची विशेष रेल्वे

पुणे : रेल्वेच्या आयआरसीटीसीमार्फत भारत गौरवची विशेष रेल्वे पुण्याहून कुंभमेळ्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. पुढील महिन्यात दि.१५ जानेवारीला रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही गाडी पुण्यातून कुंभमेळ्यासाठी सुटणार आहे, अशी माहिती आयआरसीटीसीचे टुरिझम व्यवस्थापक सुभाष नायर यांनी दिली.

केंद्र शासनाच्या देखो अपना देश या योजनेअंतर्गत भारत गौरव ही विशेष रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेद्वारे देशभरातून आत्तापर्यंत ८६ रेल्वेगाड्या धावल्या आहेत. यामुळे अनेकांना आपल्या देशातील पर्यटनाचा आनंद घेता आला आहे. यातीलच आणखी एक विशेष रेल्वेगाडी येत्या १५ तारखेला पुणे रेल्वेस्थानकावरून कुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेशसाठी सुटणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी पुणे रेल्वेस्थानकावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक गुरूराज सोन्ना उपस्थित होते. यावेळी नायर म्हणाले, पुण्यातून कुंभमेळ्यासाठी आम्ही विशेष गाडीचे नियोजन केले आहे.

या गाडीमध्ये प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. गाडीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही, जेवणाची व्यवस्था असणार आहे. तसेच, कुंभमेळ्याच्या ठिकाणी राहण्यासाठी टेंटसिटीची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. येथेही प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध असणार आहेत. ही गाडी पुणे, वाराणसी, प्रयागराज, आयोध्या, पुणे, अशी धावणार आहे. सात रात्र, आठ दिवसांचा हा प्रवास असणार आहे. या गाडीला ७ स्लीपर, ३ थर्ड एसी, १ सेकंड एसी आणि एक पेन्ट्री कार अशी डब्यांची रचना असणार आहे. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR