25.6 C
Latur
Tuesday, January 7, 2025
HomeUncategorizedअमेरिकेनंतर भारतात सर्वाधिक सायबर हल्ले!

अमेरिकेनंतर भारतात सर्वाधिक सायबर हल्ले!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अलिकडच्या काळात सायबर गुन्हेगारी वाढली असून, सातत्याने कुठे ना कुठे सायबर हल्ले करून लोकांची फसवणूक केली जात आहे. तसेच डाटा हॅक करण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यातल्या त्यात संवेदनशील माहिती, संस्था यांना लक्ष्य केले जात आहे. जगात सर्वाधिक सायबर हल्ले अमेरिकेत होत असून, भारताचा दुसरा क्रमांक आहे. एकट्या २०२४ चा विचार केल्यास अमेरिकेत सर्वाधिक १४० वेळा सायबर हल्ले झाले आहेत, तर भारतात ९५ वेळा हल्ले झाले आहेत. आगामी काळात यात आणखी वाढ होण्याची शक्यता असून, सायबर सुरक्षेच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

जगात सायबर हल्ल्यात अमेरिकेनंतर भारताला लक्ष्य केले जात असून, जगात भारताचा दुसरा क्रमांक लागत आहे. २०२४ मध्ये भारतातील ९५ संस्थांना डाटा चोरीचा सामना करावा लागला. ही धक्कादायक माहिती सायबर गुप्तचर कंपनी क्लाउडएसईकेच्या ताज्या अहवालातून समोर आली आहे. डार्क वेबच्या देखरेखीखालील आकड्यांवर आधारित कंपनीच्या थ्रेटलँडस्केप रिपोर्ट २०२४ मध्ये आर्थिक आणि डिजिटल व्यवस्थेच्या मजबुतीमुळे मागच्या वर्षी अमेरिकेत सर्वाधिक सायबर हल्ले झाल्याचे म्हटले आहे. अमेरिकेत वर्षभरात तब्बल १४० सायबर हल्ले झाल्याचे समोर आले आहे. यात भारत दुस-या क्रमांकावर असून, भारतात गतवर्षात ९५ सायबर हल्ले झाले आहेत. सायबर गुन्हेगार सातत्याने भारताला लक्ष्य करीत आहेत. यासोबतच इस्रायललाही लक्ष्य करण्यात येत असून, तेथे गेल्या वर्षभरात ५७ सायबर हल्ले झाले असून, इस्रायलचा जगात तिसरा क्रमांक लागतो.

सर्वाधिक डाटा चोरीच्या घटना हायटेक ग्रुपमध्ये झालेल्या आहेत. स्टार अ‍ॅँड अलाईड इन्शुरसच्या ग्राहकांच्या आकडेवारीनुसार ८५ कोटी भारतीय नागरिकांची माहिती चोरली गेली आहे. यात टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंटस् इंडियाचा डाटाही बराच चोरी झाला असून, या विभागाचा दुसरा क्रमांक लागतो. गेल्या वर्षात देशात १०८ रॅन्समवेअरच्या घटना घडल्या. लाकबिट हा भारताचा सर्वांत सक्रीय रॅन्समवेअर समूह होता. २० पेक्षा जास्त सायबर हल्ले या माध्यमातून झाले आहेत. किलसेकच्या माध्यमातून १५ वेळा हल्ले झाले आहेत तर रॅन्समहबने देशात १२ सायबर हल्ले केले आहेत.

बँकिंग, वित्तीय
क्षेत्र निशाण्यावर
गेल्या वर्षभरात भारतातील अनेक विभागाला सायबर गुन्हेगारांनी लक्ष्य केले. यामध्ये सर्वाधिक २० सायबर हल्ले अर्थ आणि बँकिंग सेक्टरशी संबंधित संस्थावर झालेले आहेत. यासोबतच सरकारी विभागांत १३, दूसरंचार विभागात १२ आणि हेल्थकेअर तथा फार्मा क्षेत्रात ६, शिक्षण क्षेत्रात ९ ठिकाणी सायबर हल्ले झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR