मुंबई : (प्रतिनिधी)
धुळे जिल्ह्यातील एका घटनेचा संदर्भ देउन राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणा-या अपात्र लाभार्थ्यांकडून दिलेले पैसे वसूल करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त चुकीचे आहे व अशा चुकीच्या माहितीला आपण बळी पडू नये, असे आवाहन करतानाच, लाडकी बहिण योजनेच्या सरसकट सारे अर्जाची फेरछाननी सुरु नसल्याचे स्पष्टीकरण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स या समाजमाध्यमांवरून केले आहे.
जिल्ह्यातील नकाणे गावातील खैरनार नामक महिलेने महिलेने सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे चौकशीत आढळल्याने या महिलेला दिलेले पाच महिन्याचे पैसे परत घेण्यात आल्याचे वृत्त एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते. सर्व लाभार्थ्यांची फेरपडताळणी केली जात असून निकषात न बसणा-यांना अपात्र ठरवून त्यांना दिलेले पैसे वसूल केले जाणार अशी चर्चा होती. पण महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी आज पुन्हा याचा इन्कार केला.
धुळ्यातील श्रीमती भिकुबाई प्रकाश खैरनार यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा लाभ हा त्यांच्या स्वत:च्या बँक खात्याऐवजी त्यांच्या मुलाच्या आधार कार्डला संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा झाल्याने सदर लाभ बंद करून मिळालेली रक्कम सरकारला परत करणेबाबत त्यांचा अर्ज प्राप्त झाला आहे.
तथापि, या घटनेचा संदर्भ देत महाराष्ट्र शासनाच्या वतीने लाभार्थ्यांकडून लाभ परत घेतला जात आहे अशा आशयाचे चुकीचे वृत्त प्रसिद्ध केले गेले असून, अशा चुकीच्या माहितीला आपण बळी पडू नये. अश्याप्रकारे कोणतीही सरसकट अर्जाची फेरछाननी सुरु नाही असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.