मुंबई : देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीगडमध्ये भाजपला मोठा विजय मिळताना दिसले. फक्त तेलंगणात काँग्रेसला मोठे यश मिळताना दिसत आहे. निकालाच्या समोर आलेल्या आकडेवारीवर महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली आहे.
यावेळी त्यांनी पराभव स्वीकारला आहे. या निवडणुकीत ज्या त्रुटी आढळल्या आहेत त्या दुरुस्त करून आम्ही पुढे जाऊ. पराभूत झालेल्या तीनही राज्यांमध्ये काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळेल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.
दक्षिणेमध्ये भाजपची दारे बंद झाली आहेत. पण उत्तर भारतात विशेषत: जे ध्रुवीकरणाचे राजकारण करण्यात त्यांना यश आलेले आहे हे कुणालाही नाकारता येणार नाही. हिंदू-मुस्लिम विषयावर भाजप राजकारण करतेय हे या निमित्ताने स्पष्ट होतेय. जनतेच्या विकासाच्या प्रश्नाबाबत भाजप नेहमी दूर पळतेय हे चित्र आपण पाहतोय. आम्ही आज हरलो असू पण उद्या जनता जनार्दन काँग्रेसला देशाच्या सत्तेत आणल्याशिवाय राहणार नाही. देशपातळीवर तसे वातावरण आज निर्माण झालेले आहे’’, असा दावा नाना पटोले यांनी केला.
‘‘लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारला परास्त केल्याशिवाय लोक शांत बसणार नाहीत. त्या पद्धतीचे जनमत आपल्याला बघायला मिळतेय. आपल्याला लक्षात असेल मागच्या निवडणुकीवेळी आम्ही छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश जिंकलो होतो. पण त्या निवडणुका जिंकल्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आमचे खासदार तितके निवडून आले नाहीत. आता तेच होणार आहे. आता यांना कौल दिला असेल, पण लोकसभेत काँग्रेसला कौल मिळेल’’, असादेखील दावा नाना पटोलेंनी केला.
जनता काँग्रेसच्या पाठिशी उभी राहणार
‘‘आमच्या ज्या काही त्रुटी होत्या तिथे आम्हाला शिकायला मिळालं. त्या त्रुटी आम्ही दुरुस्त करू आणि पुढे जाऊ. काँग्रेस पक्ष कधी बार्गेनिंगमध्ये राहिला नाही. काँग्रेस पक्ष नेहमी देशातील प्रत्येक पक्षाला घेऊन चालणारा पक्ष राहिला आहे. देशाच्या संविधानिक व्यवस्था आणि देशाचं स्वातंत्र्य हेच काँग्रेसला महत्त्वाचे आहे. खुर्चीपेक्षा काँग्रेस त्याच विचाराने देशामध्ये लढा देत आहे. जनता काँग्रेसच्या पाठिशी उभी राहणार आहे. आम्हाला ज्या काही त्रुटी आल्या आहेत त्या दुरुस्त करून आम्ही पुढे जाऊ. लोकसभा निवडणुकीत आम्ही विजय प्राप्त करू’’, असे नाना पटोले म्हणाले.