17.6 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeमहाराष्ट्रसारंगी महाजन यांनी केलेले आरोप बिनबुडाचे : गोविंद मुंडे

सारंगी महाजन यांनी केलेले आरोप बिनबुडाचे : गोविंद मुंडे

बीड : प्रतिनिधी
सारंगी  महाजन यांच्या जमीन खरेदीचा व्यवहार हा पूर्णपणे त्यांच्या संमतीने झालेला असून, खरेदीखत रजिस्ट्री ही रजिस्ट्री ऑफिसमध्ये झालेली आहे तसेच, मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठित व्यापारी असून सारंगी महाजन यांना व्यवहारात ठरलेली संपूर्ण रक्कम दिली आहे. महाजन यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असे सारंगी महाजन यांची जमीन खरेदी करणारे गोविंद मुंडे म्हणाले.

दरम्यान, सारंगी महाजन यांनी जमीन व्यवहारप्रकरणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून माध्यमांना प्रतिक्रिया देताना मुंडे बंधू-भगिनीवर आरोप केले होते. यावर सारंगी महाजन यांच्यासोबत झालेल्या जमिनीच्या संबंधित व्यवहाराचे पूर्ण रेकॉर्ड माझ्याकडे तसेच रजिस्ट्री कार्यालयात देखील उपलब्ध आहे. हा व्यवहार सारंगीताई व माझ्यात झालेला असून या प्रकरणाचा मंत्री धनंजय मुंडे किंवा पंकजाताई मुंडे यांचा दुरान्वये कसलाही संबंध नाही, असेही गोविंद मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

हा व्यवहार दोन वर्षांपूर्वी झालेला असून, आता दोन महिन्यांपूर्वी सारंगी महाजन यांनी याविषयी कोर्टात दावा दाखल केला असून, त्याविरुद्ध आपण आव्हान याचिका दाखल केली असल्याचेही गोविंद मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

विशेष म्हणजे सदर व्यवहार पूर्ण झाल्यानंतर आपण जेवणासह सारंगी महाजन यांचा यथोचित पाहुणचार करून त्यांना स्वत:च्या गाडीतून मुंबईला सोडवले होते, सारंगी महाजन यांनी दिलेला दावा व त्याविरुद्ध मी केलेले आव्हान हे न्यायप्रविष्ट आहे. सारंगी यांनी विनाकारण धनंजय मुंडे किंवा पंकजाताई मुंडे यांचे या व्यवहाराशी कसलाही संबंध नसताना नाव जोडून चुकीचे व बिनबुडाचे आरोप करू नयेत, असेही गोविंद मुंडे यांनी म्हटले आहे. सारंगी ताई या सुशिक्षित असून, कुठल्याही को-या कागदावर सह्या कशा करू शकतात? असेही गोविंद मुंडे म्हणाले.

सारंगी महाजन यांचा दावा
दरम्यान, गोविंद मुंडे हा धनंजय मुंडेंच्या घरी नोकर म्हणून काम करत होता, तो पंडित अण्णा मुंडेंसाठी काम करायचा. त्यानंतर, त्याच्या घरात नगरसेवक करण्यात आले, जमीन, बंगला, पैशाने तो श्रीमंत झाल्याचे सारंगी महाजन यांनी म्हटले होते. तसेच, धनंजय मुंडे व पंकजा मुंडेंच्या संगनमतानेच त्यांनी माझी जमीन हडपल्याचा दावाही सारंगी महाजन यांनी केला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR