17.6 C
Latur
Friday, January 10, 2025
HomeUncategorizedमराठवाड्यात ९४८ शेतक-यांची कर्जाच्या विवंचनेमुळे आत्महत्या

मराठवाड्यात ९४८ शेतक-यांची कर्जाच्या विवंचनेमुळे आत्महत्या

बीड जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाण

 

बीड : प्रतिनिधी
कर्ज काढून शेतीसाठी खर्च केला जातो. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे अपेक्षित उत्पन्न हाती येत नाही. यामुळे कर्ज कसे फेडायचे याची विवंचना शेतक-याला असते. यातूनच शेतकरी टोकाचा निर्णय घेतो. मराठवाड्यात हे प्रमाण अधिक असून मागील वर्षभरात मराठवाड्यातील ९४८ शेतक-यांनी वेगवेगळ्या कारणांमधून आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

शेतकरी मेहनत करून शेतातून उत्पन्न घेत असतो. शेती करताना बियाणे खरेदी, खत खरेदीसाठी हातात पैसा नसल्याने बँक, विविध कार्यकारी सोसायटीकडून कर्ज किंवा खासगी व्यक्तींकडून हात उसनवारीने पैसे घेऊन जमिनीत लावत असतो. मात्र शेतक-यांसमोर असणारे संकट म्हणजे सततची नापिकी, शेतीमालाला नसलेला योग्य भाव, नैसर्गिक संकट यातून शेतकरी कर्जबाजारी होत असतो. याशिवाय विविध समस्यांपुढे हतबल होऊन शेतकरी हा आत्महत्येसारखे पाऊल उचलत असल्याचे समोर आले आहे.

शेतकरी आत्महत्या संदर्भातील एक धक्कादायक आकडेवारी बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातून समोर आली आहे. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याचे शासन दरबारी असलेल्या नोंदीतून समोर आले. मराठवाड्यात गेल्या वर्षभरात म्हणजे २०२४ या वर्षभरात तब्बल ९४८ शेतक-यांनी आपले जीवन संपविले आहे. यामध्ये सर्वात जास्त २०५ शेतकरी आत्महत्या या एकट्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत.

दरम्यान वाढत्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यावर उपाययोजना करणार का? आणि बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येचे हे भेसूर वास्तव दूर करणार का? हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR