लातूर : प्रतिनिधी
दिनांक २ जानेवारी रोजी संध्याकाळी सात ते आठ वाजण्याच्या सुमारास विमानतळ परिसरात चार अज्ञात इसमानी रस्त्याने जाणारे येणारे लोकांना अडवून त्यांना धाक दाखवून मोबाईल व रोख रक्कम जबरीने काढून घेतल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील एका आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी संभाजीनगर जिल्ह्यातून ताब्यात घेऊन गजाआड केले आहे.
सदरील घटने प्रकरणी पोलीस ठाणे एमआयडीसी येथे अज्ञात चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस ठाणे एमआयडीसीचे पोलीस अधिकारी, अमलदारांनी तात्काळ सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली. पथकाने तक्रारदाराकडे विचारपूस करून त्यांचे वर्णन, चेहरेपट्टीची माहिती करून घेऊन आज्ञत आरोपीचा शोध घेतला असता नमूद घटनेतील एक आरोपी संभाजीनगर जिल्ह्यात असल्याचे माहिती पोलीस पथकाला मिळाली.
पोलीस पथकाने गुरूवार रोजी संभाजीनगर जिल्ह्यात जाऊन नमूद घटनेतील आरोपी नामे सोनूसिंग दीपक सिंग बोंड वय २८ वर्ष राहणार कांचनवाडी पैठण रोड संभाजीनगर यास ताब्यात घेतले आहे. त्याने व त्याच्या साथीदारांनी मिळून जबरीने चोरलेल्या दोन मोबाईलसह ताब्यात घेतले असून इतर तीन उर्वरित आरोपीच्या शोध कामे पथके रवाना करण्यात आले असून नमूद आरोपीना लवकरच अटक करण्यात येणार आहे. नमूद गुन्ह्यात आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने नमूद आरोपीला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.