पूर्णा : शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या नगर परिषदेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहत अज्ञातांनी अक्षरश: टोपलभर ब्लेड टाकल्याचा गंभीर प्रकार दि.३ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आला आहे. या ब्लेडमुळे स्वच्छतागृहात आलेल्या अनेकांच्या पायाला जखमा झाल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाची न.प. प्रशासनाने चौकशी करून ब्लेड टाकणा-यावर कारवाईची मागणी नागरीकातून होत आहे.
न.प.च्या सार्वजनिक स्वच्छता गृहात टाकण्यात आलेल्या या ब्लेड गंजलेल्या व वापर केलेल्या असल्यामुळे एखाद्याला इजा झाल्यास धनुर्वात किंवा मोठ्या आजाराला बळी पडू शकतो. सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा असतो. या दुर्गंधीमुळे परिसरातील दुकानदार व पादचारी नागरिकांना डोकेदुखी, मळमळ व उलट्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शेजारच्या भाजी मार्केटमध्ये तालुक्यातील असंख्य शेतकरी भाजीपाला आणतात. परंतू शेजारीच असलेल्या मुतारीतील अस्वच्छतेमुळे यातील किटाणू भाजीपाल्यावर बसत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे बोलले जात आहे. सदरील परिसरातील हॉटेल, खाद्य पदार्थ दुकानात येणा-या नागरीकांना दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या स्वच्छतागृहाच्या नालीतून मलमूत्र वाहत नाही. स्वच्छतागृहाची मोठी दुरावस्था झाली आहे. याकडे स्वच्छता अभियंता व मुख्याधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
नगर परिषदेची सार्वजनिक मुतारी बाजारपेठेत एकच असून या ठिकाणी स्वच्छता व दुरुस्तीची मागणीची विविध पक्ष संघटनांसह परिसरातील व्यापा-यांनी केली असून या संदर्भात् वर्तमानपत्रात बातमी येऊन देखील स्वच्छता अभियंता व मुख्याधिकारी दुर्लक्ष का करीत आहेत असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे. यात भरीसभर स्वच्छतागृहात ब्लेड टाकण्याचा गंभीर प्रकारामुळे परिसरातील नागरिक व व्यापा-यात तीव्र संताप व्यक्त करत आहेत. या गंभीर बाबीकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिक व व्यापारी करत आहेत.