26 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeलातूर‘व्यसनमुक्तीसाठी’ धावले लातूरकर

‘व्यसनमुक्तीसाठी’ धावले लातूरकर

लातूर : प्रतिनिधी
व्यसनाधीतेवर जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित ‘एक धाव व्यसनमुक्तीसाठी’ या मॅरेथॉन स्पर्धेत ६ हजाराहून अधिक लातूरकरांनी सहभाग घेतला. यामध्ये महाविद्यालयीन मुले, मुली, नागरिक यांचा सहभाग मोठया प्रमाणावर होता. तरुणांमध्ये वाढत असलेल्या व्यसनाधीनतेचे प्रमाण थांबविण्यासाठी व त्या संदर्भात जनजागृती व्हावी याकरिता लातूर पोलिसां कडून रविवार दिनांक ३ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता मॅरेथॉन स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी गुगल फॉर्मची लिंक पोलीस दलाकडून प्रसारित करण्यात आली होती. यात सहा हजारापेक्षा जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.

सदर स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यातून स्पर्धकांनी सहभाग नोंदवून बक्षिसे पटकावली. स्पर्धेच्या सुरुवातीस १० किलोमीटर स्पर्धा प्रकारास जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला. त्यानंतर ५ कि. मी. व ३ कि. मी. प्रकारातील स्पर्धकांना सोडण्यात आले. १० व ५ कि. मी. मॅरेथॉन मध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांना अनुक्रमे १० हजार, ५ हजार व ३ हजार रुपयाचे रोख बक्षिसे, मेडल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. सदर मॅरेथॉन मध्ये लातूर पोलिसांकडून अतिशय उत्तम व्यवस्थापन करण्यात आले होते.

यामध्ये फूड पॉकेट्स, एनर्जी डिंÑक्स, पाणी बॉटल्स, केळी तसेच वैद्यकीय पथक, फिजिओथेरपी पथक, अ‍ॅम्बुलन्स यांची व्यवस्था करण्यात आली होती. स्पर्धेकरिता विविध व्यवसाय संस्था, ग्रुपने काम केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी सूळ यांनी केले. कोरोना महामारीनंतर अशी भव्य दिव्य स्पर्धा प्रथमच शहरात आयोजित करण्यात आल्यामुळे स्पर्धेस सर्व वयोगटातील महिला व पुरुष यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. मॅरेथॉन कालावधीत लातूर शहरातील स्पर्धा मार्गावरती विविध शाळांतील जवळपास १ हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धकांना प्रोत्साहन देऊन व्यसनमुक्तीचे फलक घेऊन जनजागृतीचे काम केले. तसेच स्पर्धा मार्गावरती विविध ठिकाणी संगीत व म्युझिक ग्रुप्सनी भाग घेऊन स्पर्धकांचे व नागरिकांचे मनोरंजन केले. पुढील काळात प्रत्येक वर्षी अशीच मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करणे बाबत उपस्थित स्पर्धक व नागरिकांनी मागणी केली असता पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी त्याबाबत सकारात्मकता दर्शवली. स्पर्धेत लातूर शहरातील विविध सायकलिस्ट, मॉर्निंग वॉंिकग ग्रुप्स, दिव्यांग ग्रुप तसेच विविध सामाजिक संस्थांनी सहभाग नोंदविला. सदर मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR