पुणे : पुण्यातील ससूनचे कैदी रुग्ण समितीच्या अध्याक्षांनी राजीनामा दिला आहे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात संशयाच्या भोव-यात आढळल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. डॉ. सुधीर धिवारे असे या कैदी रुग्ण अध्याक्षांचे नाव आहे. २७ ऑक्टोबरला त्यांनी कैदी रुग्ण अध्याक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र सध्या ससूनमध्ये सुरु असलेल्या प्रकार आणि ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाशी त्यांचा काहीही संबंध नाही. मात्र उगाच त्यांना या प्रकरणात ओढण्याचा प्रयत्न सुरु असल्याने त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
ससून रुग्णालयात वॉर्ड ने. १६ मध्ये कैदी रुग्णांवर उपचार करण्यात येतात. या वॉर्डमध्ये येरवडा कारागृहातील रुग्ण उपचार घेत असतात. यात कैदी रुग्णांवर कोणते उपचार करायाचे याचे सगळे निर्णय ही समिती घेत असते आणि त्यांना किती दिवस रुग्णालयात ठेवायचे याचा निर्णयदेखील हिच समिती घेत असते. मात्र ललित पाटील प्रकरणासंदर्भात आता नवी माहिती हाती येत आहे. ललित पाटीलसंदर्भात सगळे निर्णय ही समिती घेत नसून ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर आणि त्यांच्यापूर्वीचे ससूनचे डीन घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकाराला कंटाळून धिवारे यांनी राजीनामा दिला आहे.
ललितला टीबी झाल्याचे ससूनच्या डीनचे पत्र
ललित पाटीलचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढावा यासाठी त्याला वेगवेगळे आजार असल्याच कागदोपत्री दाखवण्यात येत होते. ससून रुग्णालयात भरती असलेल्या ललित पाटीलची माहिती घेण्यासाठी येरवडा कारागृहाकडून विचारणा झाल्यानंतर डॉक्टर संजीव ठाकूर यांनी ललित पाटीलला टी. बी. झाल्याच उत्तर या पत्रात दिले आहे. ललित पाटीलला तीन वर्षांच्या कालावधीत अनेक आजार झाल्याचे ससून रुग्णालयाने दाखवले आहे. या पत्रावर सुधीर धिवारे यांचीदेखील सही आहे.