अकोला : मकरसंक्रांतीला पंतग उडविण्याची हौस निष्पाप नागरिकांच्या जीवावर उठली आहे. नायलॉन मांजामुळे गळा चिरल्याने एका ३४ वर्षीय युवकाचा तडफडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना १४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उड्डाणपूलावर घडली आहे.
संपूर्ण दिवसभरात नायलॉन मांजामुळे शहरात चार जण व ग्रामीण भागात तीन असे एकूण सात जण जखमी झाले आहेत. मकरसंक्रातीच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. किरण प्रकाश सोनवणे (३४ रा.अकोटफैल अकोला)असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. किरण सोनवणे हे खासगी इलेक्ट्रिशियन असून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. ते निमवाडी परिसरातून दुचाकी क्रमांक एमएच ३० एजी-१९७२ ने नेहरु पार्क चौकाकडे निघाले होते.
पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील उड्डाणपूलावर येताच त्यांच्या गळ्याला नायलॉन मांजाचा फास बसून गळा चिरला गेला. या घटनेत किरण जागेवरच कोसळले व मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा तडफडून मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला होता. यावेळी खदान पोलिस स्टेशनचे ठाणेदार मनोज केदारे यांनी सर्वाेपचारमध्ये धाव घेतली. याप्रकरणी खदान पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.