मुंबई : प्रतिनिधी
देशातील महानगरांमध्ये मुंबई हे सर्वात सुरक्षित शहर आहे. हे खरे आहे की काही घटना घडत असतात, त्यांना गंभीरतेनेच घेतले पाहिजे. पण यामुळे मुंबई असुरक्षित आहे हे म्हणणे योग्य होणार नाही. मुंबईची प्रतिमा यामुळे खराब होते. मुंबई अधिक सुरक्षित कशी होईल यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात दिली. दरम्यान, त्यांनी आणिबाणीच्या काळावरून काँग्रेसवरही टिका केली.
कंगना राणवत यांच्या इमर्जन्सी या चित्रपटाच्या खास शोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. त्यानंतर देशात लागलेल्या आणिबाणी काळाबददल ते म्हणाले, आणिबाणीच्या काळात या देशात जो काळा इतिहास घडला तो अतिशय प्रभावीपणे या चित्रपटात मांडण्यात आला आहे. स्व. इंदिरा गांधींच्या जीवनातील चांगल्या घटनाही यात मांडण्यात आल्या आहेत. त्याचवेळी १९७१ साली ज्या दृÞढतेने भारताने बांगलादेश निर्माण केला ती दृÞढताही या चित्रपटात पाहायला मिळते.
एका नेत्याचा प्रवास या चित्रपटात पाहायला मिळतो. माझे वडिल आणिबाणी दरम्यान दोन वर्षे कारावासात होते. मी त्यावेळी फक्त पाच सहा वर्षांचा होतो. आज काँग्रेस संविधान संविधान घेउन नाचते आहे, त्यांनी नाचलेच पाहिजे कारण आमचे संविधान महान आहे. मोठेच आहे. पण काँग्रेसने त्याच संविधानाची हत्या करून त्याच देशाला एक बंदीशाळा केले होते हा इतिहास देखील या चित्रपटातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला आहे.