शिवगंगाई : वृत्तसंस्था
तामिळनाडूतील विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित जल्लीकट्टू उत्सवात सात जणांचा मृत्यू झाला. गर्दीतून बैल पळवण्याच्या या खेळात एकाच दिवसात ४०० हून अधिक जण जखमी झाले. तामिळनाडू पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की, गुरुवारी कन्नम पोंगल दिवस होता. या दिवशी जल्लीकट्टू सर्वाधिक खेळला जातो. ७ लोकांव्यतिरिक्त पुदुक्कोट्टई आणि शिवगंगाई येथे २ बैलांचा मृत्यू झाला. ज्यांना जीव गमवावा लागला त्यापैकी बहुतेक हे खेळात सहभागी नव्हते, तर बैल मालक आणि प्रेक्षक होते.
पोलिसांनी सांगितले की, शिवगंगई जिल्ह्यातील सिरवायल मंजुविरट्टू येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तो या खेळात सहभागी झाला होता. त्याचवेळी मदुराईतील अलंगनाल्लूर येथे खेळ पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षकाला बैलाने जखमी केले. रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. त्याच वेळी, विविध जिल्ह्यांमध्ये जल्लीकट्टूमुळे आणखी ५ लोकांचा मृत्यू झाला. २०२५ चा पहिला जल्लीकट्टू पुदुकोट्टईच्या गंदरवाकोट्टई तालुक्यातील थचंचकुरीची गावात सुरू झाला. यानंतर त्रिची, दिंडीगुल, मानापराई, पुदुक्कोट्टई आणि शिवगंगाई या जिल्ह्यांमध्येही याचे आयोजन केले जाऊ लागले. या खेळात ६०० हून अधिक बैल सामिल होते.