सोलापूर : आंतरजिल्हा बदलीच्या पाचव्या टप्प्यात स्वजिल्ह्यात आलेल्या शिक्षकांना जिल्हा परिषदेतील शाळांवर नेमणूक मिळेपर्यंत शिक्षणाधिकारी कार्यालयात (मुख्यालय) दररोज स्वाक्षरीचे बंधन असते. परजिल्ह्यातून सोलापुरात आलेल्या २९ शिक्षकांनी मुख्यालयात येऊन स्वाक्षऱ्या केल्या. पण, स्वाक्षरीचे मस्टरच कार्यालयातून गहाळ झाल्याने त्या शिक्षकांना अजूनपर्यंत तीन महिन्यांचा पगार मिळालेला नाही. लाच प्रकरणात अडकलेले तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कार्यकाळातील हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयातून शिक्षणाधिकाऱ्यांच्या मान्यतेच्या काही नोंदवह्या (आवक- जावक) गहाळ झाल्या आहेत. त्यामुळे २० टक्के टप्पा अनुदानाच्या शाळांवरील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडीच्या प्रस्तावांवर निर्णय घेण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. याप्रकरणी तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांसह तो टेबल पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. सदर बझार पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आता प्राथमिक शिक्षण विभागातून देखील काही आवक- जावक नोंदवह्या गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील संपूर्ण रेकॉर्ड तपासले, पण काही नोंदवह्या सापडल्याच नाहीत. आता या प्रकरणी सुद्धा काही दिवसांत पोलिसांत गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा प्रकार सुरु असतानाच आता आंतरजिल्हा बदली होऊन आलेल्या शिक्षकांच्या स्वाक्षरीचे मस्टरच कार्यालयात नसल्याने विद्यमान शिक्षणाधिकाऱ्यांनी डोक्याला हात लावला आहे.
त्या शिक्षकांना पगार कधी मिळणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
आंतरजिल्हा बदलीच्या पाचव्या टप्प्यात माळशिरस, बार्शी, करमाळा, मंगळवेढा यासह इतर तालुक्यांमधील शिक्षक स्वजिल्ह्यात आले. त्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांवर नेमणूक मिळेपर्यंत त्यांनी दररोज १००-१२५ किलोमीटर प्रवास करून मुख्यालयात स्वाक्षरीसाठी हजेरी लावली. शाळा सुरु झाल्यानंतर त्यांना नेमणूक मिळाली. परंतु, स्वजिल्ह्यात आल्यानंतरच्या तीन महिन्यांचे वेतन मिळावे म्हणून त्यांनी कार्यालयात वारंवार हेलपाटे मारले. मात्र, त्यांना मस्टर सापडत नाही, शोध सुरु आहे अशी उत्तरे दिली जात असल्याची वस्तुस्थिती आहे. मस्टर गहाळ झाल्याची जबाबदारी कार्यालयाची असतानाही त्या शिक्षकांना पगार मिळत नाही.
आंतरजिल्हा बदलीतून आलेल्या शिक्षकांच्या टेबलवर काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील तत्कालीन कर्मचाऱ्याकडून स्वाक्षरीचे मस्टर गहाळ झाल्याप्रकरणी खुलासा घेतला जात आहे. दुसरीकडे कार्यालयातील दोन कपाटातील कागदपत्रे तपासणी करण्याचेही आदेश विद्यमान शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिले आहेत.