मुंबई : प्रतिनिधी
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटर प्रकरणी पाच पोलिसांना जबाबदार धरण्यात आले आहे. ठाणे दंडाधिका-यांच्या चौकशी अहवालातून तसे निष्पन्न झाले आहे. हा अहवाल सीलबंद लिफाफ्यात मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार, पोलिसांना ही परिस्थिती योग्यरित्या हाताळता आली असती. त्यांनी बळाचा वापर करणे योग्य ठरूवू शकत नाही.
ठाण्याच्या मुंब्रा बायपासवर अक्षय शिंदे याचा पोलिस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला होता. मुंब्रा बायपासवर झालेला हा एन्काउंटर वादाच्या भोर्वयात सापडला होता. या एन्काउंटरदरम्यान एकूण चारवेळा गोळीबार करण्यात आला होता. त्यातील तीन राऊंड हे आरोपी अक्षय शिंदे याने झाडले; तर एक राऊंड स्वरक्षणार्थ एसआयटी पथकातील संजय शिंदे यांनी अक्षय शिंदे याच्या दिशेने झाडला आणि एन्काउंटरमध्ये अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला, असे पोलिसांकडून सांगण्यात आले होते.
या प्रकरणी सोमवारी ठाणे दंडाधिका-यांनी त्यांचा चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर केला. शिंदे याचे वडील अण्णा शिंदे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. या याचिकेत त्यांनी दावा केला आहे की, त्यांच्या मुलाला पोलिसांनी फेक एन्काउंटरमध्ये मारण्यात आले आहे.