नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ब्रह्मोस मिसाइल प्रोजेक्ट, एस-४०० मिसाइल डिफेन्स सिस्टीमनंतर आता भारताने आता रशियासोबत ४ अब्ज डॉलर्सचा नवीन करार केला आहे. या करारांतर्गत रशियाचे अत्याधुनिक व्होरोनेझ रडार भारतात तैनात केले जाणार आहेत. या अत्याधुनिक रडार यंत्रणेची रेंज तब्बल ८,००० किलोमीटर आहे.
कर्नाटकात तैनात करणार : व्होरोनेझ हे अत्याधुनिक रडार सिस्टीम ८ हजार किलोमीटर दूरवरील हल्ल्यांना टिपण्यात सक्षम असेल. हे रडार कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग जिल्ह्यात तैनात केले जाईल. हे रडार भारतासाठी ढालीप्रमाणे काम करेल. या रडारमुळे भारत फक्त पाकिस्तान आणि चीनच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवू शकणार नाही, तर आखाती आणि आफ्रिकन देशांच्या हवाई क्षेत्रावरही बारीक नजर ठेवता येणार आहे.
व्होरोनेझ रडारचे वैशिष्ट्य
८ हजार किमी रेंजचा हा रडार एस-४०० संरक्षण प्रणालीसाठी ओळखल्या जाणा-या रशियाच्या अल्माझ अँड टेक कंपनीने बनवला आहे. हे रडार स्टेल्थ फायटर जेट्स, बॅलेस्टिक मिसाईल आणि इतर हवाई धोके सहज शोधू शकते. या ८ हजार किमी श्रेणीचा भारताला अभूतपूर्व फायदा मिळेल. याद्वारे चीन आणि पाकिस्तानच्या हवाई तळांवर कोणती विमाने उडत आहेत आणि कोणती लँडिंग करत आहेत, याची अचूक आणि वास्तविक माहिती भारताला मिळू शकेल.