मुंबई :
लोकसभेची सेमीफायनल महाराष्ट्राच्या सीमेवरील तीन राज्यात प्रामुख्याने लढली गेली. त्यामुळे या राज्यातील निकालांचा महाराष्ट्रावर प्रत्यक्ष नव्हे, तर अप्रत्यक्ष राजकीय परिणाम नक्कीच होऊ शकतो. महाराष्ट्रातील सीमेवरील मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणाच्या जिल्ह्यांचा विचार केला, तर सीमावर्ती जिल्ह्यांमधील ६९ जागांपैकी भाजपपेक्षा काँग्रेसच वरचढ ठरली आहे. ६९ जागांपैकी ३४ जागांवर काँग्रेस तर ३१ जागांवर भाजपला विजय मिळालाय. तसेच तेलंगाना आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील ४ जागांवर भारत राष्ट्र समिती ही विजयी झालीये. यामुळे लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये जरी भाजपने जोरदार विजय मिळवला असला, तरी महाराष्ट्राच्या सीमेवरील जिल्ह्यांमध्ये काँग्रेसने भाजपला कडवी झुंज दिली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
लोकसभेची सेमीफायनल ही एकदंरीतरित्या भाजपला प्रचंड यश देणारी ठरली आहे. विशेष म्हणजे निवडणुक असलेल्या पाच पैकी मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा ही तिनही राज्य महाराष्ट्राच्या शेजारची असल्याने या निवडणूक निकालांचे महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होतील हे नाकारता येणार नाही. त्याच त्याच दृष्टीने महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील निकालांची स्थिती काय राहिली आणि त्याचे महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात काय परिणाम होतील याचे विश्लेषण केले.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील आठ जिल्ह्यात एकूण ३८ विधानसभा क्षेत्र होते. त्यापैकी १८ जागा काँग्रेसकडे तर २० जागा भाजपकडे गेल्या आहेत. त्यामुळे मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला असला तरी सीमावर्ती भागात काँग्रेसने भाजपला चांगली झुंज दिल्याचं पाहायला मिळाले. मात्र, मध्यप्रदेशातील महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचा यश प्रामुख्याने काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ यांच्या छिंदवाडा जिल्ह्यातून मिळाले आहे. छिंदवाडा जिल्ह्यातील सातही जागांवर काँग्रेसने विजय मिळवलाय. बैतूल, खंडवा, बुहूरानपूर या जिल्ह्यांमध्ये भाजपला एकहाती यश मिळाले आहे. तसेच खरगोन, सिवनी, बालाघाट आणि बडवाणी या जिल्ह्यात दोन्ही पक्षांना संमिश्र यश मिळाले आहे.
दरम्यान, मध्यप्रदेशात दारुण पराभवामुळे कुठे तरी बॅकफूटवर गेलेली. पण सीमावर्ती भागात मिळालेल्या यशाने काही प्रमाणात काँग्रेसला दिलासा मिळाला असल्याचं चित्र आहे. मध्यप्रदेशाच्या सीमावर्ती भागात भाजपच्या अनेक दिगज्जना काँग्रेसने पराभूत केल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. तसेच राजकीय विश्लेषकांना महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील सीमावर्ती जिल्ह्यात काँग्रेसचा यश फक्त कमलनाथ त्या भागातील असल्यामुळेच मिळाले असल्याचे वाटत आहे.
छत्तीसगडमध्येही भाजपला मोठे बहुमत मिळाले असल्याचे पाहायला मिळाले. तरी मध्यप्रदेशासारखेच छत्तीसगडमध्येही सीमेवरील मतदारसंघात भाजपच्या तुलनेत काँग्रेसचे यश जास्त प्रभावी ठरले आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर राजनांदगाव, कांकेर, नारायणपूर आणि बिजापूर या चार जिल्ह्यांमधील १२ विधानसभा मतदारसंघात निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये १२ पैकी ८ जागांवर विजय मिळवत काँग्रेसच वरचढ ठरली आहे. त्याचप्रमाणे ४ जागांवर भाजपला विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे छत्तीसगड भाजपचे दिग्गज नेते रमण सिंह यांच्या राजनांदगाव जिल्ह्यामध्ये काँग्रेसने मोठा विजय मिळवलाय. तिथे ७ पैकी ६ जागांवर काँग्रेसला यश मिळालं. तसेच सीमावर्ती भागातीळ कांकेर, नारायणपूर आणि बिजापूर या आदिवासी जिल्ह्यात भाजपने यश मिळवलय.
महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवरील निकालांची स्थिती
महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरील जिल्ह्यातील १९ विधानसभा मतदारसंघापैकी ८ मतदारसंघात काँग्रेस, ७ मतदारसंघात भाजप तर ४ ठिकाणी बीआरएस ने विजय मिळवला आहे.विशेष म्हणजे तेलंगणामध्ये भाजपने एकूण आठ जागांवर विजय मिळवलाय. त्यापैकी सात जागा महाराष्ट्रातील सीमेवरील जिल्ह्यांमध्येच भाजपच्या झोळीत पडल्या आहे.
जागावाटपाचा तिढा
लोकसभेचे सेमीफायनल मानल्या गेलेल्या या निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा राजकारणात आणखी एक परिणाम होईल आणि तो म्हणजे महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा आणखी घट्ट होण्याची शक्यता आहे. पण दोन राज्यांमध्ये सत्ता गमावणा-या काँग्रेसचा महाविकास आघाडीमधील जागा वाटपातील वरचश्मा या निकालनमुळे कायम राहणार नसल्याच्या चर्चा सध्या आहे. त्यातच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा जास्त जागांसाठीचा काँग्रेस वरील दबाव वाढेल अशी दाट शक्यता देखील आहे.