काठमांडू : नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, युक्रेनच्या विरोधात रशियन सैन्याच्या वतीने लढणाऱ्या सहा नेपाळी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने रशियन सरकारला आपल्या लोकांचे मृतदेह पाठवण्याची विनंती केली आहे. याशिवाय नेपाळने रशियाला मारल्या गेलेल्या नेपाळी नागरिकांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची मागणी केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रशियन सरकारने या लढ्यासाठी नेपाळी नागरिकांची भरती करू नये आणि जर कोणाची भरती झाली असेल तर त्याला तातडीने नेपाळला पाठवावे.
रशियाच्या बाजूने नेपाळ आणि इतर देशांचे नागरिक युक्रेनविरुद्धच्या युद्धात असल्याच्या चर्चा आहेत. रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश या युद्धातून मागे हटायला तयार नाहीत. या युद्धात दोन्ही बाजूंच्या अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या दोन वर्षांपासून युद्ध सुरू आहे. तसेच नाटोकडून एक धक्कादायक विधान समोर आले आहे. नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी युक्रेनला अत्यंत आवश्यक युद्धसामुग्री प्रदान करण्यात लष्करी गटाच्या अपयशाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, युक्रेनचे सैन्य गेल्या अनेक महिन्यांत युद्धभूमीवर कोणतेही यश मिळवण्यात अपयशी ठरले आहे. आपण या देशाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.