23.8 C
Latur
Monday, February 3, 2025
Homeमहाराष्ट्रसायंकाळी ६ वाजल्यानंतरच्या मतदानाचे व्हीडीओ फुटेज द्या

सायंकाळी ६ वाजल्यानंतरच्या मतदानाचे व्हीडीओ फुटेज द्या

उच्च न्यायालयाची आयोगाला नोटीस

मुंबई : विधानसभा निवडणुकीत सायंकाळी ६ वाजेनंतर झालेल्या मतदानाच्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोगाला नोटीस दिली. सायंकाळी ६ वाजेनंतर झालेल्या मतदानाचे व्हीडीओ फुटेज देण्याचे आदेश दिले आहे.

मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर संध्याकाळी सहा वाजल्यानंतर ७६ लाख मतदान झाल्याचे दिसत आहे. जर एवढे मतदान झाले असेल तर संध्याकाळनंतर प्रत्येक बुथवर किती मतदारांना टोकन वाटले याची आकडेवारी आणि व्हीडीओ क्लीप द्या, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांच्यासह विरोधी पक्षाने केली आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज सुनावणी झाली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिका-याला नोटीस बजावण्यात आली.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? मतदानाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजेनंतर झालेले जे मतदान आहे, त्यासंदर्भात असणारा जो स्लीपचा रेकॉर्ड आहे, तो रेकॉर्ड आमच्याकडे नाही, असे उत्तर मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातून मिळाले होते. त्यामुळे आता कोर्टाने त्यांच्याकडे ती माहिती उपलब्ध आहे की नाही याबाबत विचारणा केली आहे. निवडणूक आयोगाकडे ती माहिती नसेल, तर ६ वाजेनंतर झालेले मतदान झाले की नाही झाले, हा मुद्दा आहे. ६ वाजेनंतरच्या मतदानाची आकडेवारी आहे, ते मतदान झालेलेच नाही, असे आम्ही कोर्टात सांगितले, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

निवडणूक आयोग निवडणुका पारदर्शीकपणे पार पाडल्याचा दावा करत असेल, तर तोच त्यांनी कोर्टासमोर करावा आणि त्यांच्याकडे किती स्लीप्स वाटल्या आणि किती वाटल्या नाहीत त्याची माहिती कोर्टासमोर द्यावी, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. निवडणुकीचा निकाल जाहीर करताना पोल वोट्स आणि काउंटर वोट्स यांची जुळवणी झाली पाहिजे. यांची जुळवणी झाली नसेल, तर मग रिटर्निंक ऑफिसरने तो सगळा दस्तऐवज निवडणूक आयोगाकडे पाठवला पाहिजे. त्यानंतर निवडणूक आयोग जे सांगेल, त्यानुसार तो निकाल दिला पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

१५० मतदारसंघांत २० ते २५ हजार मतदार वाढवले
मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीज बजावल्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शेवटच्या तासात वाढलेले मतदान हा घोटाळा असल्याची टीका करत सरकारवर हल्ला चढवला. विधानसभेच्या निवडणुकीत संध्याकाळी ६ नंतर ७६ लाख मतदान कसे? निवडणूक आयोग म्हणते हे शक्य आहे, अरे कसे शक्य आहे? ७६ लाख? साधारण दीडशे मतदारसंघात तर जवळपास २० ते २५ हजार मतदार वाढवले आहेत. आणि प्रत्येक बूथ वर शंभर ते दीडशे मत वाढवले, असा दावा संजय राऊत यांनी केला. या घोळातून महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे सरकार स्थापन झाले. हे सरळ मार्गाने सरकार आलेले नाही आणि हायकोर्टाने विचारले की हे बरोबर आहे का? पण जनता सुद्धा तेच विचारत आहे. हायकोर्टाने विचारलेल्या प्रश्नाच्या मुळापर्यंत गेले तरच या देशातील लोकशाहीला एक भक्कम आधार मिळेल, असे संजय राऊत म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR