23.8 C
Latur
Monday, February 3, 2025
Homeसंपादकीययोगींची लपवाछपवी?

योगींची लपवाछपवी?

मौनी अमावस्येला प्रयागराज येथील कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत ४१ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रयागराजच्या संगमावर स्नान करण्यासाठी मौनी अमावस्येला लाखो भाविकांची गर्दी उसळली होती. या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांनी प्राण गमावले. चेंगराचेंगरीत किती जणांचा मृत्यू झाला त्याचा अधिकृत आकडा योगी सरकारने रविवारी जाहीर केला. त्यानुसार हा आकडा ३० असला तरी विविध राज्यांमध्ये पाठवण्यात आलेल्या भाविकांच्या पार्थिवाची गणना केल्यास हा आकडा ४४ पर्यंत जातो त्यामुळे योगी सरकार याबाबत लपवाछपवी करत आहे, असा संशय व्यक्त केला जात आहे.

कोरोना काळात महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाले, असे सांगून उद्धव ठाकरेंच्या मविआ सरकारला सातत्याने धारेवर धरण्याचा प्रयत्न सुरू होता. त्याच वेळी उत्तर प्रदेशात कितीतरी अधिक पटीने कोरानाचे मृत्यू झाले, अशी चर्चा होती. कोरोनात मृत्यू झालेल्यांपैकी अनेकांचे मृतदेह गंगा नदीत तरंंगताना आढळले होते तशी छायाचित्रेही प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर अडचणीत आलेल्या योगी सरकारने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला होता. कोरोना काळात योगी सरकारने ज्या प्रमाणे मृतांची लपवाछपवी केली त्याच प्रमाणे आता चेंगराचेंगरीत दुर्दैवी मृत्यू झालेल्यांच्या संख्येबाबत योगी सरकार लपवाछपवी करत आहे, असा विरोधकांचा आरोप आहे. मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीचा तपास उत्तर प्रदेश पोलिसांचा स्पेशल टास्क फोर्स (एमटीएफ) करत आहे. या दुर्घटनेमागे एखादे कटकारस्थान होते काय? याचाही तपास हे पथक करत आहे. यासाठी एमटीएफ परिसरातील सक्रिय मोबाईल नंबरचे तपशील तपासत आहे.

आतापर्यंत १६ हजार मोबाईल क्रमांकाचा डेटा तपासण्यात आला आहे. यातील अनेक मोबाईल चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर बंद झाले आहेत त्याचीही चौकशी सुरू आहे. वसंत पंचमीनिमित्त महाकुंभात होणारे तिसरे अमृतस्नान सोमवारी पहाटे ५ वाजता सुरू झाले. सर्वप्रथम पहाटे ४ वाजता पंचायत आखाडा अमृतस्नानासाठी संगमावर पोहोचला. त्यानंतर एकामागून एक असे १२ आखाडे स्नान करतील. २९-३० जानेवारीच्या मध्यरात्री महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर योगी सरकारने गर्दीचे व्यवस्थापन आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना केल्या आहेत. मुख्य स्नान महोत्सवाच्या एक दिवस आधी आणि एक दिवसनंतर शहरात वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. सर्व व्हीआयपी पास रद्द करण्यात आले आहेत.

तिस-या अमृतस्नानासाठी ५ कोटी भाविक येतील, असा अंदाज आहे. आतापर्यंत ३३ कोटींहून अधिक भाविकांनी महाकुंभात पवित्र स्नान केले आहे. महाकुंभमेळ्यासाठी अलोट गर्दी होत असल्याने व्यवस्थापनाच्या नाकीनऊ येणे स्वाभाविक आहे. अशा वेळी भाविकांनी संयम राखणे अत्यंत महत्त्वाचे असते. कारण अतिउत्साह आणि आवेश यामुळे उद्भवणा-या अघटिताचा फटका शेवटी त्यांनाच बसतो. देशात धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते आणि या गर्दीवर योग्य नियंत्रण न राहिल्यास चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटना घडतात. गत काही वर्षात देशात अनेक ठिकाणी चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. दरवेळी अशा दुर्घटना घडल्यानंतर त्याचा तपास करण्यासाठी चौकशी समित्या स्थापन होतात,

यथावकाश त्यांचा अहवाल सादर होतो. त्यातून गर्दी नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वांची शिफारस केली जाते; परंतु त्याची काटेकोर अंमलबजावणी न झाल्याने पुन्हा दुर्घटना घडत राहतात. हे दुष्टचक्र संपतच नाही. ४० दिवस चालणा-या महाकुंभमेळ्याने अर्धा टप्पा पार केला आहे. यात २ आगीच्या घटना आणि चेंगराचेंगरीची घटना घडली. कुंभमेळ्याला उसळणारी गर्दी पाहता काहीतरी अप्रिय घडणार असे वाटत होते, नेमके तसेच झाले. प्रयागराजच्या कुंभमेळ्याची जबाबदारी योगी सरकारवर आहे. त्यांनी व्यापक प्रमाणात सुरक्षा व्यवस्था आणि भाविकांना सुविधा उपलब्ध करून दिल्याचा दावा केला होता; परंतु मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीमुळे तो फोल ठरला. यंदाचा महाकुंभमेळा वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे मानले जाते कारण १४४ वर्षानंतर हा शुभयोग आल्याने या कुंभमेळ्याला आणखीनच महत्त्व आले आहे.

कुंभमेळ्यात धार्मिक विधी करण्यासाठी प्रचंड गर्दी होणार हे लक्षात घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत आयोजन करण्यात आले होते. चेंगराचेंगरीसारखी घटना टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत होता. वाहनतळ, मार्ग वळविणे, बॅरिकेडिंग आदींची व्यवस्था करण्यात आली होती; परंतु चेंगराचेंगरीची दुर्घटना घडल्यामुळे सर्व मेहनतीवर पाणी फेरले गेले. कुंभमेळ्यासाठी देशभरातून विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या होत्या, बसची शटल सेवा सुरू करण्यात आली होती. विमान सेवाही वाढवण्यात आली होती. सोशल मीडियाने कुंभमेळ्याला अभूतपूर्व प्रसिद्धी दिली होती. देशभरात राज्य सरकारांना प्रथमच कुंभमेळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते त्यामुळे देशभरात कुंभमेळ्याचे आकर्षण वाढले होते. त्यातूनच गर्दीचा ओघ वाढतच गेला. जागतिक स्तरावर चर्चिल्या गेलेल्या महाकुंभाचे आयोजन ही भारतासाठी सुसंधी होती.

कोणत्याही दुर्घटनेशिवाय हा महाकुंभ पार पडला असता तर जगभरासाठी भारताने एक नवा आदर्श घडवला असता. कोट्यवधीने जमणा-या गर्दीचे योजनाबद्ध व्यवस्थापन करण्याची क्षमता आपल्या देशात आहे हे जगाला दाखवून देता आले असते. भविष्यात आपला देश ऑलिम्पिकसारखी जागतिक स्पर्धा आयोजित करण्याची मनीषा बाळगून आहे. त्यासाठी कुंभमेळा हा माईलस्टोन ठरला असता; परंतु इतका दूरदर्शी विचार करण्याची आपल्याला सवयच नाही, असे चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटनेवरून दिसून येते. आपल्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनही व्यवस्थापन निर्धोक बनवता येत नाही, असेच म्हणावे लागेल. तसे न झाले की मग वस्तुस्थिती लपवाछपवीचे उद्योग सुचतात. खरे पाहता अशा दुर्घटनांना सरकार आणि भाविक तेवढेच जबाबदार ठरतात. सर्वांत खेदाची गोष्ट म्हणजे जुन्या अप्रिय घटनांतून आपण काहीच धडा घेत नाहीत. कोट्यवधींच्या संख्येने लोक जमत असतील तर अशा प्रकारची घटना घडणे साहजिक आहे, असे म्हणून जबाबदारी झटकता येणार नाही. एका व्यक्तीचा मृत्यूदेखील व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणारा आहे. आपल्या व्यवस्थेला मानवी जीवनाचे मोल कधी समजणार आहे की नाही? हा खरा प्रश्न आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR