नवी दिल्ली : वृत्तसंस्था
डॉलरच्या तुलनेत आशियाई देशांच्या चलनात मोठी घसरण झाली. अमेरिकेने कॅनडा आणि मेक्सिकोवर टॅरिफ लादले आहे. या घटनांचा परिणाम होऊन भारताच्या रुपयासह आशियातील इतर देशांच्या चलनात घसरण झाली. भारताचा रुपया डॉलरच्या तुलनेत ८७.१२ रुपयांपर्यंत घसरल्याचे पाहायला मिळाले.
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरुच असल्याने भारत ज्या वस्तूंची आयात करतो, त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे पर्यायाने किमती वाढू शकतात. रुपयात घसरण झाल्याने भारत ज्या वस्तू आयात करतो, त्यावरील खर्च वाढेल, त्यात कच्चे तेल, खाद्य तेल, डाळ यासारख्या इतर गोष्टींचा समावेश आहे. या आवश्यक गोष्टींचा आयात खर्च वाढल्यानंतर बाजारात त्याच्या दरात देखील वाढ होऊ शकते.
भारत कच्च्या तेलाचा सर्वात मोठा आयातदार आहे. रुपया कमजोर झाल्याने त्यासाठी खर्च कराव्या लागणा-या रकमेत वाढ होईल. याचा परिणाम म्हणून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू शकतात. प्रवासाचा खर्च वाढू शकतो. त्यामुळे अप्रत्यक्षपणे इतर गोष्टींच्या किमती वाढू शकतात. इलेक्ट्रॉनिक आणि कॅपिटल गुड्सदेखील महाग होऊ शकतात. कारण इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि मशिनरी आयात केली जाते. त्यामुळे त्याच्या आयातीचा खर्च वाढेल. पर्यायाने ग्राहकांवर याचा बोजा पडू शकतो.
औषधीसाठी मोजावे लागणार ज्यादा पैसे
भारतात मोठ्या प्रमाणावर औषधे विदेशातून आयात केली जातात. रुपयाच्या घसरणीचा प्रभाव औषधाच्या किमतीवरदेखील होऊ शकतो. अमेरिकेकडून लावण्यात येत असलेल्या टॅरिफमुळे डॉलर मजबूत झाला आहे. याच्या झळा भारतीयांना सोसाव्या लागत आहेत. विशेषत: आशिया खंडातील चलन घसरल्याने आयात वस्तूंसाठी ज्यादा किंमत मोजावी लागत असल्याने ग्राहकांनाही या वस्तू खरेदीसाठी अधिक पैसे द्यावे लागू शकतात. पर्यायाने महागाईच्या झळा अधिक तीव्र होताना दिसत आहेत.