मुजफ्फराबाद : वृत्तसंस्था
पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादमध्ये एका कार्यक्रमात पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल सैयद असीम मुनीर यांनी युद्धाची धमकी दिली. काश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तान कधीही मागे हटण्यासाठी तयार होणार नाही. काश्मीरसाठी पाकिस्तानचे लष्कर आणखी १० युद्धे लढण्यासाठी तयार आहे. त्यांच्या ताकदीसमोर पाकिस्तान ना पूर्वी कधी घाबरलेला ना पुढे घाबरणार, असे मुनीर यांनी म्हटले आहे.
काश्मीरसाठी पाकिस्तानने आधीच तीन युद्धे लढली आहेत. अजून १० युद्धे लढावी लागली तरी पाकिस्तान लढेल. भारताच्या लष्करी सामर्थ्याने किंवा त्याच्या प्रगत तंत्रज्ञानाने पाकिस्तान घाबरणार नाही. काश्मिरी जनतेच्या पाठीशी सर्व शक्तीनिशी उभे राहू, असे त्यांनी म्हटले. काश्मीर ही पाकिस्तानची अशी नस आहे जी कापली तर मृत्यू ओढवतो. काश्मीर हा आपल्या देशाचा प्राण आहे. हा प्राण आपण आपल्या शरीरातून कसा जाऊ देऊ शकतो? असे त्यांनी म्हटले आहे.
एक दिवस काश्मीर नक्कीच स्वतंत्र होईल आणि पाकिस्तानात येईल. हेच काश्मीरच्या लोकांच्या भाग्यात आहे. ते खरे होईल, असे मुनीर बरळले आहेत. पाकिस्तान प्रगती करत आहे आणि काश्मीर (पीओके) लाही त्याचा फायदा होईल, असे ते म्हणाले. पाकिस्तानकडे ४८ अब्ज डॉलर्स किमतीचे नैसर्गिक वायू पाइपलाइन नेटवर्क आहे, त्याशिवाय ७ ट्रिलियन डॉलर्स किमतीचे खनिज संसाधने आहेत, असा देश कधीही दिवाळखोर होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.