मुंबई : दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘मिचॉन्ग’ या चक्रीवादळाने दक्षिण भारतातील काही भागांत कहर करायला सुरुवात केली आहे.
तामिळनाडूच्या अनेक भागांत जोरदार वा-यांसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्राच्या हवामानावरही परिणाम होत आहे. मिचॉन्ग चक्रीवादळामुळे मुंबई आणि उपनगरांत पारा वाढण्याची शक्यता आहे.
सध्याच्या आठवड्यात मुंबईत उष्ण हवामान राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या काळात दिवसाचे तापमान ३१ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. येत्या काही दिवसांत वातावरणातील तापमानात निर्माण झालेल्या प्रणालीमुळे शहर आणि परिसरात अंशत: ढगांचे आच्छादन आणि धुके राहील. परिणामी हवेची गुणवत्ताही ढासळण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे.