पुणे – तिसरे अक्षरविश्व मराठी साहित्य संमेलन येत्या १२ डिसेंबर २०२३ रोजी काठमांडू येथे होणार असून रसिकांना परिसंवाद, मुलाखत, कविसंमेलन, गझल दरबार, पुस्तक प्रकाशन, अभिवाचन आदींची मेजवानी मिळणार आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक कवी राजन लाखे यांची निवड झाली आहे.
लाखे हे सध्या महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष असून साहित्य क्षेत्रातील त्यांचे योगदान दखलपात्र आहे. काव्य, ललित, कथा, संपादन क्षेत्रात त्यांची ग्रंथसंपदा असून शांता शेळके जन्मशताब्दी ग्रंथ ‘बकुळगंध’ची त्यांनी केलेली निर्मिती मराठी साहित्य इतिहासात अभिनव ठरली आहे.
संमेलनात पुणे गोवा, बंगळुरू, मुंबई, ठाणे आणि अमेरिका येथून साहित्यिक, कवी, रसिक सहभागी होणार असल्याचे आयोजक तसेच स्नेहल आर्टस् एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा कल्पना गवारे यांनी सांगितले. –