36.1 C
Latur
Friday, March 14, 2025
HomeUncategorizedमाझा तुमच्यावर विश्वास नाही : हवाई दल प्रमुख

माझा तुमच्यावर विश्वास नाही : हवाई दल प्रमुख

मिशन । ‘तेजस’च्या डिलिव्हरीला विलंब; हिंदुस्तान एअरोनॉटीक्सवर व्यक्त केली नाराजी

 

नाशिक : वृत्तसंस्था
तेजस लढाऊ विमानांच्या डिलिव्हरीला होत असलेल्या विलंबावरून हवाई दल प्रमुखांनी सरकारी कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ला चांगलेच सुनावले आहे. याबाबतचा व्हिडीओ एका न्यूज पोर्टलने पोस्ट केला असून ‘एचएएल’च्या प्रमुखांनाच हे बोल सुनावल्याने कंपनीसाठी ही चिंतेची बाब बनली आहे.

पाकिस्तान एकीकडे चीनकडून अद्ययावत लढाऊ विमाने घेण्याच्या तयारीत आहे. चीन दुस-या बाजुने भारताच्या सीमेवर शस्त्रास्त्रे वाढवत आहे. अशातच भारताकडे मात्र, तीच जुनी लढाऊ विमाने आणि शस्त्रे आहेत. ‘एचएएल’ हवाई दलाला तेजस लढाऊ विमानांची पुढची पिढी देणार आहे. परंतू, अमेरिकेने या लढाऊ विमानांच्या इंजिन पुरवण्यात विलंब केला आहे. तसेच ‘एचएएल’मध्ये अंतर्गत समस्या आहेत. यामुळे या फेब्रुवारीत हवाई दलाला मिळणारी ११ लढाऊ विमाने मिळू शकलेली नाहीत.

एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी आज ‘एचएएल’ला भेट दिली. यावेळी त्यांना ‘एचजेटी-३६ यशस’ दाखविण्यात आले. सिंग हे या विमानाच्या कॉकपिटमध्ये बसत असताना त्यांनी माझा तुमच्यावर विश्वास नाहीय, असे स्पष्ट शब्दांत सांगून टाकले. मला ‘एचएएल’वर विश्वास नाहीय, ही गंभीर बाब आहे. मी तुम्हाला केवळ माझी गरज आणि चिंताच सांगू शकतो. तुम्हाला ती दूर करावी लागेल. आम्हाला विश्वास द्यावा लागेल. आतातरी मला तुमच्यावर विश्वास नाहीय. मला वाटतेय की, ‘एचएएल’ मिशन मोडवर काम करत नाही. मला ११ तेजस एमके १ए विमाने देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतू एकही विमान अद्याप तयार नाही, अशा शब्दांत सिंग यांनी नाराजी व्यक्त केली.
हवाई दल प्रमुखांनी एअरो इंडिया २०२५ मध्ये देखील ‘एचएएल’वर टीका केली होती. सॉफ्टवेअर किंवा दिसण्यात बदल करून जमणार नाही. जेव्हा त्यात शस्त्रास्त्रे आणि क्षमता येईल तेव्हाच ते खरे लढाऊ विमान असेल अशा शब्दांत सिंग यांनी फटकारले होते. यात काहीच मजा आली नाही, असे सिंग म्हणाले.

महत्वाचे म्हणजे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दोन दिवसांपूर्वीच तेजसवरून ‘एचएएल’ची प्रशंसा केली होती. यानंतर सिंग यांचे विरोधी वक्तव्य आल्याने चिंतेची बाब मानली जात आहे. यावर प्रसारमाध्यमांनी सिंग यांचे म्हणणे नकारात्मक दाखविल्याचे हवाई दलाने म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR