मुंबई : सरहदच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. यावरून ठाकरे गटाकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा याच मुद्यावरून एकनाथ शिंदे आणि भाजपावर हल्लाबोल केला आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांना पित्यासमान असल्याचे म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली नसती, तर अजित पवार फुटले नसते, सरकार कोसळले नसते. त्यामुळे मी जी भूमिका मांडतोय ती शरद पवारांची भूमिका असायला हवी. एकनाथ शिंदे या माणसाने अमित शाह यांच्याशी हातमिळवणी करून पक्ष फोडले, तुम्ही त्याची भलामण करत आहात. मी बोललो, कारण माझ्यात हिंमत आहे, हे ढोंगी, भंपक लोक आहेत. मला अजिबात पोटदुखी नाही. शरद पवारांनी तिथे जाणे महाराष्ट्राला रुचलेले नाही. त्यांच्या पक्षातील नेत्यांना पटलेले नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला.
त्यांना महादजी शिंदे यांच्या नावाने पुरस्कार देणे, हा शूर योद्धा जो दिल्लीपुढे कधी झुकला नाही, त्या महादजी शिंदे यांचा अपमान आहे, ही आमची भूमिका आहे. आम्हाला असे प्रश्न केले की, आम्ही पवार साहेबांवर टीका करत आहोत म्हणतात. माझे आणि पवार साहेबांचे संबंध यांना माहिती नाहीत. ते आम्हाला पित्यासमान आहेत. पण मी आमच्या पक्षाची भूमिका मांडली. शरद पवारांवर टीका केली नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच शरद पवारांबद्दल आमच्या मनात नाराजी नाही. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने महाराष्ट्राने ज्याला गद्दार म्हणून संबोधित केले, ज्याने बेईमानी करुन अमित शाह यांच्याशी हातमिळवणी करुन सरकार पाडले. त्याचा सत्कार शरद पवार यांच्या हातून होणे हा शरद पवार यांचा अपमान आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.