नवी दिल्ली : संसदेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी व्यापारी दर्शन हिरानंदानी यांच्याकडून लाच घेतल्याबद्दल महुआ मोइत्रा यांची सभागृहातून हकालपट्टी करण्याची शिफारस करणारा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर करण्यात आला आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून या अधिवेशनात लोकसभा अध्यक्षांकडून यावर निर्णय येण्याची शक्यता आहे. महुआ मोइत्रा यांची अपात्रता निश्चित असल्याचा कयास बांधला जात आहे. महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाईवरून काँग्रेस आणि जेएमएम पक्षाने केंद्र सरकारवर टीका केली आहे.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांचा संसदेचा अधिकृत लॉगिन आयडी केवळ दुबईतील व्यावसायिक मित्र दर्शन हिरानंदानी यांनाच शेअर केला नसून, त्याचबरोबर इतर ठिकाणीही शेअर केल्याचे समोर आले आहे. त्यांचे अकाउंट दुबईबरोबरच अमेरिका, बंगळुरू येथूनही ऑपरेट झाल्याचे सूत्रांनी सांगितले. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने समितीला सांगितले की, मोइत्रांचे लॉगिन अमेरिका, बंगळुरू, कोलकाता व दुबईहूनही वापरण्यात आले. मोइत्रांच्या दाव्यांची दखल घेत लोकसभा सचिवालयाने नवे नियम जारी करून म्हटले आहे की, खासदारांना त्यांचे लॉगिन आयडी त्यांच्या सदस्यांसमवेतही शेअर करता येणार नाहीत.
संसदेच्या हिवाळी अधिवेशानाचा दुसरा दिवस असून या प्रकरणी भाष्य करताना महुआ मोइत्रा यांनी सावध पवित्रा घेतल्याचे सांगितले जात आहे. आता पुढे काय होते, ते पाहुया, अशी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे, झारखंड मुक्ती मोर्चा म्हणजेच जेएमएम खासदार महुआ मांझी यांनी महुआ मोइत्रा यांना पांिठबा दर्शवला आहे. आरोप सिद्ध झालेले नाहीत. मोइत्रा यांना त्रास दिला जात आहे. तसेच आचार समितीने ज्या पद्धतीने त्यांची चौकशी केली आणि प्रश्न विचारले, ते आक्षेपार्ह होते. कारण नसताना हे प्रकरण मोठे केले जात आहे, असे महुआ मांझी यांनी म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी यावर भाष्य केले आहे. हा एक राजकीय षडयंत्राचा भाग आहे. महुआ मोइत्रा यांना मुद्दामहून लक्ष्य केले जात आहे, असा आरोप जयराम रमेश यांनी केला आहे.